मोदी सरकारनं घेतलेल्या नोटबंदी, जीएसटी आणि लॉकडाउनच्या निर्णयांची पोलखोल करत काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी भारतीयांना एकजूट होण्याचं आवाहन केलं आहे. राहुल गांधी यांनी ‘अर्थव्यवस्था की बात’ या व्हिडीओतून मोदी सरकारच्या धोरणांवर टीका केली. “नोटबंदी, जीएसटी व लॉकडाउन हे ती चुकीचे निर्णय मोदी सरकारनं घेतले. या तिन्हींचा उद्देश असंघटित क्षेत्र उद्ध्वस्त करण्याचा असून, तुम्हाला लुटलं जातंय. गुलाम बनवण्याचा प्रयत्न होतोय. त्यामुळे लढा देण्यासाठी एकजूट व्हा,” असं आवाहन राहुल गांधी यांनी देशवासीयांना केलं आहे.

मोदी सरकारच्या धोरणांवर सातत्यानं टीका करणारे काँग्रेसचे नेते राहुल गांधी ‘अर्थव्यवस्था की बात’ व्हिडीओ मालिकेच्या माध्यमातून देशाच्या अर्थव्यवस्थेवर भाष्य करणार आहे. राहुल गांधी यांनी पहिला व्हिडीओ ट्विट केला असून, देशातील असंघटित क्षेत्र उद्ध्वस्त करण्याचा मोदी सरकारचा असल्याचा आरोप केला आहे.

राहुल गांधी काय म्हणाले?

“भाजपा सरकारनं असंघटित अर्थव्यवस्थेवर आक्रमण केलं आहे आणि तुम्हाला गुलाम बनवण्याचा प्रयत्न केला जात आहे. २००८ मध्ये आर्थिक महामंदी आली. संपूर्ण जगात आली. अमेरिका, जपान, युरोप, चीन सगळीकडेच आली. अमेरिकेतील बँका कोसळल्या. कंपन्या बंद झाल्या. एकपाठोपाठ एक कंपन्या बंद होत गेल्या. युरोपमधील बँकांही कोसळल्या. पण भारतात याचा काहीही परिणाम झाला नाही. त्यावेळी युपीएचं सरकार होतं. मी पंतप्रधानांकडे गेलो. मी मनमोहन सिंग यांना विचारलं, संपूर्ण जगात आर्थिक नुकसान झालं आहे. पण भारतावर कोणताही परिणाम झालेला नाही. यामागचं कारण काय? त्यांनी मला सांगितलं, ‘जर भारताची अर्थव्यवस्था समजून घ्यायची असेल, तर सर्वात आधी हे समजून घ्यावं लागेल की, भारतात दोन अर्थव्यवस्था आहेत. पहिली असंघटित अर्थव्यवस्था आणि दुसरी संघटित अर्थव्यवस्था. संघटित अर्थव्यस्थेत येतात मोठ्या कंपन्या. नावं आपल्याला माहिती आहेत. असंघटित अर्थव्यवस्थेत येतात शेतकरी, कामगार, किरकोळ विक्रेते, लघू व मध्यम कंपन्या. ज्या दिवसापर्यंत भारतातील असंघटित व्यवस्था मजबूत राहिल, त्या दिवसापर्यंत भारतावर कोणतंही आर्थिक संकट येऊ शकत नाही.’

आणखी वाचा- Fact check : पंतप्रधान मोदींच्या ‘मन की बात’वर लाईकपेक्षा जास्त डिसलाईकचा पाऊस, काय आहे सत्य?

आता सध्याच्या परिस्थितीवर बघू. मागील सहा वर्षात भाजपा सरकारनं असंघटित क्षेत्रावर आक्रमण केलं आहे. तीन मोठी उदाहरण मी आता तुम्हाला देतो. नोटबंदी, सदोष जीएसटी आणि लॉकडाउन. तुम्ही हा विचार नका करू की, अचानक लॉकडाउन लावण्यात आला. त्यामागे कोणताही विचार नव्हता. या तिन्हीचा उद्देश असंघटित क्षेत्राला संपवण्याचं आहे. पंतप्रधानांना सरकार चालवण्यासाठी मीडियाची गरज आहे. मार्केटिंगची गरज आहे. मीडिया व मार्केटिंग १५ ते २० लोक करतात. असंघटित क्षेत्रात प्रचंड पैसा आहे. पण त्याला हे लोक हात लावू शकत नाही. त्याला हे लोक तोडू इच्छितात. पैसै घेऊ इच्छितात. याचा परिणाम असा होईल की भारत रोजगार निर्मिती करू शकणार नाही. कारण असंघटित क्षेत्र ९० टक्क्यांपेक्षा जास्त रोजगार देते. ज्या दिवशी असंघटित क्षेत्र संपेल, त्या दिवसापासून भारत रोजगार निर्माण करू शकणार नाही. तुम्हीच या देशाला चालवत आहात, पुढे नेत आहात. आणि तुमच्या विरोधातच कट रचला जात आहे. तुम्हाला लुटलं जातंय. तुम्हाला गुलाम बनवण्याचा प्रयत्न होतोय. आपल्याला हे आक्रमण ओळखावं लागेल आणि पूर्ण देशाला एकजूट होऊन याविरुद्ध लढाव लागेल,” असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.