भाजपाप्रणीत एनडीएने लोकसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवल्यानंतर १७ व्या लोकसभेचे सत्र सोमवारपासून सुरु झाले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह नव्याने निवडून आलेल्या सदस्यांनी लोकसभा सदस्यत्वाची शपथ घेतली. यावेळी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी देखील चौथ्यांदा लोकसभा सदस्यत्वाची शपथ घेतली. मात्र, ते काहीसे गोंधळलेल्या अवस्थेत दिसले. शपथ घेतल्यानंतर ते नोंदवहीत स्वाक्षरी करायचे विसरले आणि आपल्या जागेवर जाण्यासाठी निघाले. यावेळी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्यासह इतर काही खासदारांनी त्यांनी स्वाक्षरी करण्याचा इशारा केला. त्यानंतर राहुल गांधी पुन्हा आले आणि त्यांनी स्वाक्षरी केली.

लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी यांना पारंपारिक अमेठी मतदारसंघातून स्मृती इराणींकडून पराभव पत्करावा लागला. मात्र, केरळमधील वायनाड येथून ते विक्रमी मतांनी निवडून आले. त्यांनी इंग्रजीतून लोकसभा सदस्यत्वाची शपथ घेतली. सकाळच्या वेळेत पंतप्रधानांसह सर्व प्रमुख खासदारांनी शपथ घेतल्यानंतर राहुल गांधी दुपारच्या जेवणानंतर सभागृहात आले आणि शपथ घेतली. त्यानंतर स्वाक्षरी न करताच ते आपल्या जागेवर जाऊन बसले.

शपथ घेण्यापूर्वी त्यांनी ट्विटही केले होते. यात त्यांनी म्हटले होते की, लोकसभा सदस्य म्हणून आजपासून माझा कार्यकाळ सुरु होत आहे. मी केरळच्या वायनाडचे प्रतिनिधीत्व करताना संसदेत नवी सुरुवात करेन. भारताच्या संविधानाप्रती मी खरी निष्ठा आणि विश्वास राखेन याचा तुम्हाला विश्वास देतो.

राहुल गांधी आपल्या पारंपारिक अमेठी मतदारसंघातून पराभूत झाले. मात्र, त्यांच्या आई युपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी या पारंपारिक रायबरेली मतदारसंघातून निवडून आल्या आहेत. त्यामुळे त्यांनीही यावेळी लोकसभा सदस्यत्वाची शपथ घेतली.