देशाच्या इतिहासातील महत्त्वाच्या पैलूंकडे इतिहासकारांनी दुर्लक्ष केले आणि स्वातंत्र्यानंतर त्याबाबत सखोल अभ्यास न करताच मांडणी केली, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी येथे व्यक्त केले. देशाच्या सांस्कृतिक वारशाचे जतन करणे हा राष्ट्रउभारणीतील एक महत्त्वाचा पैलू आहे, असेही ते म्हणाले.

आम्हाला आपल्या देशाचा सांस्कृतिक वारसा जगाला दाखवायचा आहे, भारताला सांस्कृतिक वारसा पर्यटन केंद्र करावयाचे आहे, देशातील पाच पुराणवस्तू संग्रहालये आंतरराष्ट्रीय दर्जाची करावयाची आहेत आणि त्याची सुरुवात कोलकातामधील भारतीय पुराणवस्तू संग्रहालयापासून होत आहे, असे मोदी म्हणाले.

कोलकातामधील ओल्ड करन्सी बिल्डिंग, द बेल्व्हेडेअर हाऊस, द मेटकाफ हाऊस आणि द व्हिक्टोरिया मेमोरियल हॉल या नूतनीकरण केलेल्या चार इमारती मोदी यांनी देशाला समर्पित केल्या. ब्रिटिशांच्या राजवटीत आणि स्वातंत्र्यानंतरही जो इतिहास लिहिला गेला तेव्हा अनेक महत्त्वाच्या पैलूंकडे दुर्लक्ष झाले, ही दुर्दैवी बाब आहे, असे ते म्हणाले.