पेट्रोल-डिझेलच्या सातत्याने वाढणाऱ्या दरामुळे जर तुम्ही त्रस्त असाल तर येणाऱ्या काही दिवसांत तुमचा खिसा आणखी रिकामा होऊ शकतो. सध्या कच्च्या तेलाचे दर आंतरराष्ट्रीय बाजारात प्रती बॅरल ६० डॉलरपर्यंत पोहोचले आहेत. याचदरम्यान कच्च्या तेलाचा सर्वांत मोठ्या उत्पादक देशांपैकी एक सौदी अरेबियाचे राजे मोहम्मद बिन सलमान यांनी मार्च २०१८ पर्यंत पुरवठा आणि उत्पादन कमी करण्याचे समर्थन केले आहे. त्यामुळे येणाऱ्या दिवसांत कच्च्या तेलाचे दर आणखी वाढू शकतात.

याचा थेट परिणाम भारतातील पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीवर पडेल. कारण भारतातील इंधनाचे दर हे आंतरराष्ट्रीय बाजारानुसार दर दिवशी बदलतात. वॉल स्ट्रीट जर्नलच्या मते प्रिन्स मोहम्मद यांच्या या वक्तव्यामुळे ३० नोव्हेंबरला होणाऱ्या ओपेकच्या बैठकीत पुन्हा एकदा कच्च्या तेलाचे उत्पादन घटवण्यास एकमत होण्याचे संकेत मिळत आहेत. ओपेकमध्ये सहभागी देशांत सौदी अरेबिया सर्वांत मोठा आणि प्रभावशाली तेल उत्पादक देश आहे.

तेल उत्पादक देशांचा समूह ओपेकमध्ये १४ देशांचा सहभाग आहे. यामध्ये इराण, इराक, सौदी अरेबिया, कतार, यूएई, अल्जेरिया, अंगोला, इक्वाडोर, कुवेत, व्हेनेजुएला, लिबिया आणि नायजेरियासारख्या देशांचा समावेश आहे. जर ओपेक देशांचे तेलाचे उत्पादन घटवण्यास एकमत झाले तर रशियाकडूनही असा निर्णय घेतला जाऊ शकतो.