ज्येष्ठ साहित्यिक श्याम मनोहर यांचे प्रतिपादन

अभिजात मराठी वाङ्मयाला इतिहास असला तरी परंपरा नाही. त्यामुळे मागचं काही वाचलं नाही तरी चालतं, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक श्याम मनोहर यांनी शनिवारी येथे व्यक्त केले. नीट जगणे आणि विविध प्रकारचे कुतूहल या माणसाच्या दोन मूलभूत प्रेरणा आहेत. सभ्यतेचा संदर्भ जगण्याशी आणि संस्कृतीचा संदर्भ शोधण्याशी असतो. त्या अर्थाने संस्कृतीचे वाङ्मय अभिजात आणि कालातीत असते, असेही मनोहर म्हणाले.

९१व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळातर्फे  श्याम मनोहर यांचा महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद जोशी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यावेळी मनोहर बोलत होते. ते म्हणाले, साहित्याच्या माध्यमातून आपल्याला संस्कृतीपर्यंत पोहोचायचे आहे. गहन प्रश्न आणि उत्तर मिळवण्याचे प्रयत्न हे संस्कृतीचे लक्षण आहे. जगणे प्रसंगांनी बनलेले असते आणि एखाद्या प्रसंगातून जीवनाचा अर्थ निघतो. जगण्यात सभ्यता आणली पाहिजे आणि सभ्यतेमध्ये एक कोपरा ज्ञानासाठी जिवंत ठेवला पाहिजे. असे केल्यास जगण्यातले विकार जाणार नाहीत हे खरे असले तरी किमान उफाळून येणार नाहीत. साहित्य, कथा, कविता ही ज्ञानक्षेत्रे आहेत. गणितज्ञ, इतिहासकार, कलावंत, लेखक कसे असतात, कसे काम करतात, त्यांचे मन आणि बुद्धी कशी असते, हे कोणी जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे का, असा सवाल मनोहर यांनी उपस्थित केला. ते म्हणाले, राजकारणात डावे-उजवे होते. त्याची चर्चा होते. मात्र ज्ञानाची चर्चा होते का, हा खरा प्रश्न आहे. ज्ञान केवळ मिळवायचे नसते, तर ते निर्माणही करायचे असते. समाजाला नुसते सांगण्याची तपश्चर्या करावी, जिंकण्याचा हट्ट नको. सांगावे, बोलावे आणि सविस्तर लिहावे.

यावेळी गुजराती साहित्यिक सितांशु यशचंद्र यांच्या हस्ते मनोहर यांच्या ‘प्रेम आणि खूप खूप नंतर’ व ‘लोचना आणि आलोचना’ या पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले.  चित्रा मनोहर, संमेलनाचे कार्याध्यक्ष दिलीप खोपकर, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी या वेळी उपस्थित होते.

मनोहर यांच्याबरोबरच ज्येष्ठ साहित्यिक गंगाधर पानतावणे यांना पद्म पुरस्कार मिळाल्याने गौरव केला जाणार होता. मात्र प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते उपस्थित राहू शकले नाहीत. त्यांच्या घरी जाऊन त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे.

वाचनालयांचा देश व्हावा

आपल्या देशात सुंदर, प्रशस्त, मोफत, सुसज्ज आणि जिथे जावेसे वाटेल अशी वाचनालये असावीत, असे आपल्यालाच वाटत नाही का? सर्व पक्षांच्या जाहीरनाम्यामध्ये समृद्ध वाचनालयांचा मुद्दा समाविष्ट करावा आणि तो पूर्ण करावा, असे होईल का, याकडे लक्ष वेधून श्याम मनोहर यांनी आपला देश वाचनालयांचा व्हायला हवा, अशी अपेक्षा व्यक्त केली. शेतकरी, लेखक आपल्या कामातून जगतील, अशी परिस्थिती निर्माण व्हावी, असेही ते म्हणाले.

मराठी कविता उपेक्षित? : अर्थसंकल्प मांडताना अन्य भाषांतील कवितेच्या ओळी म्हटल्या जातात. म्हणजे मराठी साहित्य समाजात खोलवर रुजलेले नाही, की उल्लेख करावा असे काव्य मराठीत नाही, असा प्रश्न मनोहर यांनी मांडला.