देश सध्या करोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत आहे. सध्या रुग्णसंख्या कमी होत असली तरीही करोनाचा धोका टळलेला नाही. अशातच एक दुःखद बातमी समोर येत आहे. करोनाच्या कचाट्यात सापडून एकाच कुटुंबातल्या सात जणांचा मृत्यू झाला आहे.

उत्तर प्रदेशातल्या लखनौजवळच्या इमलिया गावातल्या एका परिवाराने आपल्या सात आप्तांना गमावलं. २५ एप्रिल ते १५ मे या २० दिवसांच्या कालावधीमध्ये ओमकार यादव यांच्या परिवारातल्या सात जणांचा मृत्यू झाला. त्यापैकी सहा जणांना करोनाची लागण झाली होती तर एकाला हृदयविकाराचा झटका आल्याने त्याचाही मृत्यू झाला.

आणखी वाचा- देशात करोनाची दुसरी लाट ओसरतेय; गेल्या २४ तासात आढळले १,२७,५१० रुग्ण

या घटनेबद्दल आजतकने सविस्तर वृत्त दिलं आहे. त्यानुसार, सरकार आणि स्थानिक प्रशासन कोणतीही पावलं उचलायला तयार नाहीत. गावचे प्रमुख मेवाराम यांनी सांगितलं की, एका गावात एवढे मृत्यू होत आहेत याबद्दल चौकशी व्हायला हवी. मात्र, गावात साधी स्वच्छतेची सुविधाही उपलब्ध करुन दिलेली नाही.

त्यांनी सरकारवर असेही आरोप केले आहेत की, मृत व्यक्तींना योग्य उपचार मिळाले नाहीत, त्यांना ऑक्सिजनयुक्त बेड्स मिळाले नाहीत. सरकारला दोष देताना ते म्हणतात, गावात ५९ करोना रुग्ण आढळले आहेत आणि या सर्वांना स्वतःची काळजी स्वतःच घ्यावी लागत आहे.