भारतीय बँकांना हजारो कोटी रुपयांचा चुना लावून पसार झालेल्या विजय मल्ल्याच्या प्रत्यार्पणावर ब्रिटनच्या न्यायाधीशांनी चिंता व्यक्त करत आर्थर रोड कारागृहाचा व्हिडीओ दाखवण्याची मागणी केली आहे. विजय मल्ल्याने कारागृहात उजेड किंवा पाणी नसल्याची तक्रार न्यायालयात केली होती. यानंतर लंडनच्या वेस्टमिनिस्टर्स मॅजिस्ट्रेट कोर्टाच्या जज एमा आर्बथनॉट यांनी भारताला व्हिडीओ सादर करण्याचा आदेश दिला. व्हिडीओ सादर करण्यासाठी तीन आठवड्यांचा वेळ देण्यात आला आहे. १२ सप्टेंबरला याप्रकरणी पुढील सुनावणी होणार आहे.

याआधीही प्रत्यार्पणाच्या याचिकेवरील सुनावणीदरम्यान न्यायाधीशांनी आर्थर रोड कारागृहातील बराक क्रमांक १२ मध्ये नैसर्गिक उजेड आणि वैद्यकीय सुविधेवरुन चिंता व्यक्त केली होती. विजय मल्ल्याचं भारतात प्रत्यार्पण केल्यास त्याला आर्थर रोड कारागृहात ठेवण्यात येणार आहे. भारताने न्यायालयात कारागृहाचे फोटो सादर केले होते. मात्र त्यावरुन आपण अंदाज बांधू शकत नसल्याचं सांगत न्यायाधीशांनी व्हिडीओ मागितला आहे.

‘तुम्ही दुपारी व्हिडीओ शूट करु शकता का ? मला नैसर्गिक उजेड, सुर्यप्रकाश पहायचा आहे. खिडकीतून प्रकाश येतो की नाही याची खात्री करायची आहे’, असं न्यायाधीशांनी सांगितलं आहे.

विजय मल्ल्याला भारतात आणल्यानंतर आर्थर रोड जेलमध्ये ठेवण्यात येणार आहे अशी माहिती आहे. आर्थर रोड कारागृहाची नेमकी काय परिस्थिती आहे, कोणत्या सुविधा उपलब्ध आहेत याची माहिती केंद्र सरकारने लंडन कोर्टमध्ये दिली होती. विजय मल्ल्याची आर्थर रोड कारागृहात रवानगी झाल्यास बराक क्रमांक 12 मध्ये ठेवण्यात येणार आहे. याच ठिकाणी मुंबई 26/11 हल्ल्यातील दहशतवादी अजमल कसाबला ठेवण्यात आलं होतं. आर्थर रोड कारागृहात मल्ल्याच्या सुरक्षेची सर्व व्यवस्था उपलब्ध आहे अशी माहिती केंद्र सरकारने आपल्या रिपोर्टमध्ये दिली होती. 1925 रोजी बांधकाम करण्यात आलेल्या आर्थर रोड कारागृहाची 804 कैद्यांची क्षमता आहे.

2 मार्च २०१७ला विजय मल्ल्या दुपारी 1.30 वाजता जेट एअरवेजच्या दिल्ली – लंडन ‘9W 122’ विमानाने रवाना झाला होता. विजय मल्ल्याला देश सोडून जाण्यास मनाई करणारा आदेश द्यावा याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात १७ सार्वजनिक बँकांच्या कन्सोर्टियमने याचिका केली होती, मात्र विजय मल्ल्या अगोदरच देश सोडून रवाना झाल्याची माहिती ऍटर्नी जनरल यांनी न्यायालयात दिली होती..