अमेरिकेतील गोपनीय माहिती फोडल्याने प्रकाशझोतात आलेला एडवर्ड स्नोडेन आपल्यासमवेत त्याच विमानातून प्रवास करीत असल्याचा संशय आल्यावरून विमान नियोजित मार्गावरून अन्यत्र वळविण्यात आल्याने बोलिव्हियाचे अध्यक्ष इव्हो मोराल्स संतप्त झाले असून, त्यांनी बोलिव्हियातील अमेरिकेचा दूतावासच बंद करण्याची धमकी दिली आहे. मोराल्स यांना आर्जेण्टिना, व्हेनेझुएला, इक्वेडॉर, उरुग्वे आदी देशांनी पाठिंबा दर्शविला आहे.
अमेरिकेतील हेरगिरीविरुद्धची कारवाई टाळण्यासाठी स्नोडेन याने विविध देशांकडे आश्रयासाठी अर्ज केला असून, त्याच्या अर्जाचा सहानुभूतीपूर्वक विचार करण्याची आपली इच्छा आहे, असे मोराल्स यांनी मॉस्कोत जाहीर केल्यानंतर मोराल्स यांच्याबाबत हे हवाईनाटय़ घडले.
बोलिव्हियात आम्हाला अमेरिकेच्या दूतावासाची गरज नाही. अमेरिकेचे दूतावास बंद करण्याचा निर्णय घेताना आपले हात थरथरणार नाहीत. आम्ही सार्वभौम आहोत आणि अमेरिकेपेक्षा राजकीय आणि लोकशाहीदृष्टय़ाही सक्षम आहोत, असे मोराल्स यांनी म्हटले आहे. व्हिएन्नामध्ये वास्तव्य करून मोराल्स बुधवारी रात्री  बोलिव्हियात पोहोचले. आपल्या विमानाला युरोपीय देशांवरून उडण्याची परवानगी नाकारण्यात आली, असे ते म्हणाले. त्यामुळे लॅटिन अमेरिकन देशांतील नेत्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.