ताजमहालाचा रंग फिका पडत चालल्याने सर्वोच्च न्यायालयाने चिंता व्यक्त करत मोदी सरकारला फटकारले आहे. ताजमहालाचा रंगा फिका पडत चालला आहे याची काही दखल तुम्ही घेत आहात का? असे फटकारत मोदी सरकारला या प्रश्नी उत्तर मागितले आहे. ताजमहालाचा रंग पिवळसर होता तो आता तपकिरी आणि हिरवट होत चालला आहे याची तुम्हाला काहीही चिंता वाटत नाही का? असेही सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला विचारले आहे

केंद्र सरकारने भारत आणि परदेशातील तज्ज्ञांची मदत घ्यावी आणि ताजमहालचे कितपत नुकसान झाले आहे त्याचा प्रथम आढावा घ्यावा आणि त्यानंतर या ऐतिहासिक स्मारकाला गतवैभव प्राप्त व्हावे यासाठी पावले उचलावी, असे सर्वोच्च न्यायालयाने सुचविले आहे. आपल्याकडे तज्ज्ञ आहेत किंवा नाहीत या बाबत आपल्याला कल्पना नाही, तज्ज्ञ असतील तर त्यांची सेवा तुम्ही वापरत नाहीत किंवा त्याची तुम्हाला फिकीर नाही, असे न्या. एम. बी. लोकूर आणि न्या. दीपक गुप्ता यांच्या पीठाने म्हटले आहे.

याचिकाकर्ते एम. सी. मेहता यांनी सादर केलेली छायाचित्रे सर्वोच्च न्यायालयाने पाहिली. त्यानंतर ताजमहालचा रंग का बदलत चालला आहे, अशी विचारणा पीठाने अतिरिक्त सॉलिसिटर जनरल ए. एन. एस. नाडकर्णी यांच्याकडे केली. यापूर्वी ताजमहालचा रंग पिवळसर झाला होता आणि आता तो तपकिरी आणि हिरवा होत चालला आहे, असे निरीक्षण पीठाने नोंदविले. ताजमहालचे व्यवस्थापन भारतीय पुरातत्त्व विभागाच्या वतीने करण्यात येते. या बाबत पुढील सुनावणी ९ मे रोजी होणार आहे.