चंदनतस्कर वीरप्पन याच्या चार साथीदारांच्या फाशीच्या शिक्षेच्या अंमलबजावणीला सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी पुढील आदेशापर्यंत स्थगिती दिली. 
दुसऱया खंडपीठात याच संदर्भातील याचिकेचा निकाल अद्याप प्रलंबित आहे. त्यामुळे त्यावर निकाल आल्याशिवाय सर्वोच्च न्यायालयाचे हे खंडपीठ आपला निकाल देऊ शकत नाही, असे सांगत न्यायालयाने या प्रकरणाची पुढील सुनावणी सहा महिन्यांनी घेण्याचे स्पष्ट केले. सरन्यायाधीस अल्तमास कबीर यांच्या नेतृत्त्वाखालील खंडपीठाने हा निर्णय घेतला. पुढील आदेश देईपर्यंत फाशीच्या अंमलबजावणीस दिलेली स्थगिती कायम राहील, असेही न्यायालयाने म्हटले आहे.
१९९३ मध्ये कर्नाटकात वीरप्पन याच्या चार साथीदारांनी भूसुरुंग स्फोट केला होता. त्यामध्ये २२ पोलिसांचा जीव गेला होता. याच खटल्यात न्यायालयाने गणप्रकाश, सिमॉन, मीसेकर मादैह आणि बिलावेंद्रन यांना फाशीची शिक्षा सुनावली होती. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी चौघांचाही दयेचा अर्ज फेटाळला होता.