नवी दिल्ली : अल्वर येथे गायीची तस्करी करीत असल्याच्या संशयातून जमावाने अकबर खान याला ठार केल्याच्या प्रकरणात राजस्थान सरकारविरोधात न्यायालयाचा अवमान केल्याबाबत कारवाई करण्याची मागणी करणाऱ्या याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाल्या असून त्यावर २८ ऑगस्ट रोजी सुनावणी करण्यात येणार असल्याचे न्यायालयाने जाहीर केले आहे.

तुषार गांधी व काँग्रेस नेते तेहसीन पुनावाला यांनी या याचिका दाखल केल्या असून त्यात असा आरोप केला आहे की, सर्वोच्च न्यायालयाने याबाबत ताकीद देऊनही जमावाचा हिंसाचार व गोरक्षकांचा धुडगूस सुरूच आहे.

सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांनी सांगितले की, २८ ऑगस्टला याबाबतच्या सर्व याचिकांची सुनावणी करण्यात येईल. न्या. मिश्रा, न्या. ए. एम. खानविलकर, न्या. धनंजय चंद्रचूड यांनी गांधी व पुनावाला यांच्या राजस्थान सरकारविरोधात कारवाई करण्याच्या याचिकेवर सुनावणी करण्याचे मान्य केले.

सर्वोच्च न्यायालयाने जमावाच्या हिंसाचाराबाबत नुकत्याच दिलेल्या निकालाचे राज्य सरकारने तंतोतंत पालन करायला हवे  होते असे याचिकादारांनी म्हटले आहे. २८ ऑगस्टला मुख्य याचिकेबरोबर इतर याचिकांची सुनावणी करण्यात येईल.

२१ जुलैला अकबर खान याची राजस्थानातील अल्वर जिल्ह्य़ात गोतस्कर असल्याच्या संशयावरून जमावाने हत्या केली होती. राजस्थानात याच जिल्ह्य़ात पेहलू खानची हत्या १ एप्रिल २०१७ रोजी झाली होती.

गेल्या वर्षी उमर खान याचा मृतदेह रेल्वे रूळावर सापडला होता. त्याला गोतस्करीच्या संशयावरून ठार मारण्यात आल्याचा आरोप आहे.

अल्वरच्या घटनेबाबत केंद्राने अहवाल मागवला

नवी दिल्ली : राजस्थानातील अल्वर जिल्हय़ात २१ जुलैला गोतस्करीच्या संशयातून जमावाने अकबर खान याला ठेचून मारल्याच्या घटनेबाबत केंद्र सरकारने राजस्थान सरकारकडून अहवाल मागवला आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने सांगितले, की राजस्थान सरकारने या घटनेबाबत सविस्तर माहिती द्यावी. दोषींवर कारवाई तसेच शांतता प्रस्थापित करण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांबाबत सविस्तर स्पष्टीकरण देण्यात यावे. लवकरात लवकर हा अहवाल देण्यात यावा. अकबर खान (वय २८) याचा अल्वर येथे गेल्या शनिवारी गोतस्करीच्या संशयातून लालवंडी येथे जमावाच्या मारहाणीतून मृत्यू झाला होता. राजस्थान पोलिसांनी या प्रकरणी चौकशी समिती नेमली आहे. अकबर खान याला रुग्णालयात नेण्यात पोलिसांनी विलंब केल्याचाही आरोप आहे.