सिंधमधील अल्पवयीन हिंदू मुलींचे अपहरण

पाकिस्तानच्या सिंध प्रांतातून दोन अल्पवयीन हिंदू मुलींचे अपहरण, सक्तीने धर्मातर आणि त्यांचा बालविवाह लावल्याच्या वृत्तावरून दोन्ही देशांच्या वरिष्ठ मंत्र्यांमध्ये शाब्दिक युद्धाला ट्विटरवर तोंड फुटले. दोनहिंदू मुलींचे अपहरण आणि सक्तीच्या धर्मातराबाबतचा तपशील भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी पाकिस्तानातील भारतीय राजदूतांकडे मागितल्यानंतर या वादाला तोंड फुटले.

या मुलींविषयीचे वृत्त कळताच स्वराज यांनी पाकिस्तानातील उच्चायुक्तांना याबाबतचा अहवाल पाठवण्याचे आदेश दिल्याचे ट्वीट केले. त्यांच्या ट्वीटला पाकिस्तानचे माहितीमंत्री फवाद चौधरी यांनी प्रतिसाद देताना, हा आमचा देशांतर्गत मामला असल्याचे म्हटले. त्यांच्या ट्वीटला प्रत्युत्तर देताना, सुषमा स्वराज म्हणाल्या, ‘‘मिस्टर मिनिस्टर, मी दोन अल्पवयीन हिंदू मुलींचे अपहरण आणि सक्तीच्या धर्मातराविषयी इस्लामाबादमधील भारतीय उच्चायुक्तांकडे फक्त अहवाल मागितला. परंतु तुमची चिडचिड होण्यासाठी एवढे पुरेसे ठरले. यातून फक्त तुमचा सदोष विचार दिसतो.’’

स्वराज यांच्या या ट्वीटला चौधरींनी पुन्हा उत्तर दिले. ते म्हणाले, ‘‘मॅडम मिनिस्टर, भारतीय प्रशासनात अन्य देशांतील अल्पसंख्याकांच्या हक्कांची काळजी वाहणारे लोक आहेत, याबद्दल मला आनंद वाटतो. परंतु तुमचा विवेक तुम्हाला तुमच्या देशातील अल्पसंख्य समाजाच्या बाजूने- विशेषत: गुजरात आणि जम्मू-काश्मीरमधील- उभे राहण्याची परवानगी देईल, अशी आशा मी प्रामाणिकपणे व्यक्त करतो.’’

चौकशीचे इम्रान यांचे आदेश

या प्रकरणाची सखोल चौकशी करून मुलींना मुक्त करण्याचे आदेश पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी दिले. पाकिस्तानातील हिंदू समुदायाने मोठय़ा प्रमाणावर निदर्शने करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली. पाकिस्तानात हिंदूची लोकसंख्या ७५ लाख आहे.

प्रकरण काय?

पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील रवीना (१३) आणि रीना (१५) या हिंदू मुलींचे होळीच्या दिवशी अपहरण करण्यात आले. अपहरणानंतर लगेचच त्यांचा निकाह लावण्यात आल्याची चित्रफीत समाजमाध्यमांवर प्रसारित झाली. परिणामी देशभर संताप व्यक्त झाला. आणखी एक वेगळी ध्वनिचित्रफीतही नंतर प्रसारित झाली. तीत या मुली आपण स्वखुशीने इस्लाम धर्म स्वीकारल्याचे सांगत होत्या.