देशात गेल्या २४ तासांत विक्रमी २०.६६ लाख चाचण्या करण्यात आल्या असून एका दिवसातील हा उच्चांक आहे, असे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. लागोपाठ चौथ्या दिवशी वीस लाखांहून अधिक चाचण्या झाल्या आहेत.

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार गेल्या २४ तासांत २०.६६ लाख चाचण्या झाल्या असून भारतात ही विक्रमी संख्या आहे. देशात आतापर्यंत १९.३३ कोटी इतक्या लशीच्या मात्रा देण्यात आल्या आहेत. शनिवारी सायंकाळी सात वाजेपर्यंतच्या हंगामी अहवालानुसार १९ कोटी ३३ लाख ७२ हजार ८१९ जणांना लस मात्रा देण्यात आल्या आहेत. एकूण २७ लाख ७६  हजार ९३६ इतक्या सत्रात हे लसीकरण करण्यात आले. आरोग्य कर्मचाऱ्यांना ९७ लाख ३८ हजार १४८ इतक्या पहिल्या मात्रा देण्यात आल्या असून ६६ लाख ९१ लाख ३५० दुसऱ्या मात्रा देण्यात आल्या आहेत.आघाडीच्या कर्मचाऱ्यात १ कोटी ४८ लाख ७० हजार ८१ जणांना पहिली तर ८३ लाख ६ हजार २० जणांना दुसरी मात्रा देण्यात आली. १८-४४ गटात ९२ लाख ९७ हजार ५३२ जणांना पहिली मात्रा देण्यात आली आहे. ४५-६० वयोगटातील  ६ कोटी ११ हजार ९५७ जणांना पहिली तर ९६ लाख ८४ हजार २९५ जणांना दुसरी, साठ वयोगटातील ५ कोटी ६३ लाख ८३ हजार ७६० जणांना पहिली तर १ कोटी ८१ लाख ८९ हजार ६७६ जणांना दुसरी मात्रा देण्यात आली.

दिवसभरात ४१९४ जणांचा मृत्यू

देशात सलग सहाव्या दिवशी करोनाची लागण होणाऱ्यांची दैनंदिन संख्या तीन लाखांपेक्षा कमी नोंदविली गेली. गेल्या २४ तासांत २.५७ लाख जणांना करोनाची लागण झाली त्यामुळे बाधितांची एकूण संख्या दोन कोटी ६२ लाख ८९ हजार २९० वर पोहोचली. तर करोनामुळे एका दिवसात ४१९४ जणांचा मृत्यू झाला, असे शनिवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या वतीने सांगण्यात आले.