पश्चिम बंगालमधील निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. त्यात कधी भाजपाचे पारडे जड वाटते आहे तर कधी ममतांच्या तृणमुल काँग्रेसचे (टीएमसी). नागरिकांना मात्र रोज नवनवीन आरोप प्रत्यारोप पहायला मिळत आहेत. त्यातच गुरूवारी तृणमुल काँग्रेसने उप निवडणूक आयुक्त सुदीप जैन यांना राज्य निवडणुक आयोगाच्या प्रभारीपदावरून काढण्यात यावे अशी मागणी केली आहे. जैन हे भाजपा समर्थक आहे असा त्यांच्यावर आरोप करण्यात आला आहे.

राज्यसभेचे खासदार आणि टीएमसीचे प्रमुख नेते डेरेक ओब्रायन यांनी पश्चिम बंगालच्या मुख्य निवडणुक आयोगाला एक पत्र लिहिले आहे. त्यात ओब्रायन म्हणाले, “श्री. सुदिप जैन निःपक्षपाती पणे काम करतील आणि सर्वच पक्षांकडे त्यांचा दृष्टिकोन समान असेल यावर आम्हाला गंभीर शंका आहे, त्यांनी भाजपाला झुकते माप दिले आहे, कारण त्यांच्या सर्व कृती भाजपाला अनुकूल असल्याचे दिसून येत आहे. आम्हाला श्री सुदीप जैन यांच्यावर विश्वास नाही. ”

ते पुढे म्हणाले, “वरील बाबींच्या पार्श्वभूमीवर आम्ही तुम्हाला असे अवाहन करू इच्छितो की प्रभारी सुदीप जैन यांना पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक, २०२१ च्या निवडणूक आयोगाच्या प्रमुख पदावरून हटवावे.”

दोन दिवसापूर्वीच लाभार्थ्यांना देण्यात आलेल्या डिजिटल कोविड -१९ लसीकरण प्रमाणपत्रांवर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो वापरल्याबद्दल तृणमूल कॉंग्रेसने निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. चार राज्य आणि एका केंद्रशासित प्रदेशातील विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यानंतर हे आचारसंहितेचे उल्लंघन नाही का असा सवाल डेरेक ओब्रायन यांनी केला होता.