जपानच्या शिनोडा प्लाझ्मा कंपनीचे डिस्प्ले वीकमध्ये सादरीकरण
जपानच्या अभियंत्यांनी दूरचित्रवाणी संचाची पुढची पिढी कशी असेल याचा आदर्श घालून देत, गुंडाळून ठेवता येईल असा दूरचित्रवाणी पडदा तयार केला आहे. तो ‘प्लाझ्मा टीव्ही’ असून त्याचा पहिला नमुना तयार करून तो नुकताच सादर करण्यात आला आहे. अतिशय लवचिक असा या टीव्हीचा पडदा आहे.
जपानच्या शिनोडा प्लाझ्मा कंपनीने हा प्लाझ्मा स्क्रीन व्हँकूव्हर येथे ‘डिस्प्ले वीक २०१३’ या परिषदेत गेल्या महिन्यात सादर केला. या प्लाझ्मा स्क्रीनला बेस्ट प्रोटोटाइप अ‍ॅट डिस्प्ले वीक म्हणून गौरवण्यात आले आहे. कंपनीने या टीव्ही पडद्याचे नामकरण ‘ल्युमिनस अ‍ॅरे फिल्म’ म्हणजे एलएएफआय असे केले आहे.
एकाच मोठय़ा काचेच्या तुकडय़ापासून पडदा तयार करण्याऐवजी या पडद्यात काचेच्या छोटय़ा अनेक नलिका वापरण्यात आलेल्या आहेत. यातील प्रत्येक नलिका ही १ मि.मी व्यासाची असून ३ फूट लांबीची आहे.
या नलिकांचा संच म्हणजेच हा टीव्ही पडदा असून तो गुंडाळून ठेवता येतो. तो गुंडाळल्यानंतर त्याची एक गोलाकार नळकांडी तयार होते तिचा व्यास अवघा चार इंच आहे. या काचेच्या नलिका लहान आहेत, शिवाय पोकळ आहेत. त्यात निष्क्रिय वायू किंवा प्रतिमा निर्मितीसाठी लागणारे फॉस्फर राहू शकतात.
शिनोडा कंपनीने अशा प्रकारचे मोठे पडदे तयार केले असून त्यांना ‘शिपला’ असे नाव देण्यात आले आहे. ते २ मीटर बाय १ मीटर आकाराचे पॅनल आहेत.
या वक्राकार पडद्यांचा वापर हा म्युझियम किंवा पब्लिक डिस्प्ले म्हणून करता येतो. कंपनी आता ०.५ मि.मी व्यासाच्या नलिका वापरून टीव्ही पडदे तयार करीत असून त्यामुळे त्याची आणखी छोटी गुंडाळी होऊ शकेल.