कुख्यात गँगस्टर विकास दुबेशी असलेल्या संबंधांप्रकरणी कानपूर पोलिसांनी बुधवारी चौबेपूर पोलीस ठाण्याचे एसएचओ विनय तिवारी आणि उप निरीक्षक के.के.शर्मा या दोघांना अटक केली. विकास दुबेवर आठ पोलिसांची हत्या केल्याचा आरोप आहे. मागच्या आठवडयात हे हत्याकांड घडले. उत्तर प्रदेश पोलिसांकडून विकास दुबेचा युद्धपातळीवर शोध सुरु आहे.

आज सकाळीच उत्तर प्रदेश पोलिसांच्या विशेष पथकाने हमिदपूर जिल्ह्यात चकमकीत विकास दुबेचा जवळचा सहकारी अमर दुबेला ठार केलं. या हत्याकांडानंतर तिवारी आणि शर्मा दोघांना निलंबित करण्यात आले होते. शुक्रवारी मध्यरात्री विकास दुबेच्या ठिकाणावर छापा मारण्यात येणार होता. पण त्याआधीच त्याला माहिती मिळाली. या कारवाई दरम्यान आठ पोलिसांचा मृत्यू झाला. विनय तिवारी आणि के.के.शर्मा या दोघांवर छापेमारीची कारवाई होण्याआधीच विकास दुबेला टीप दिल्याचा आरोप आहे. हिंदुस्थान टाइम्सने हे वृत्त दिले आहे.

दोन्ही अधिकाऱ्यांविरोधात आयपीसीच्या कलम १२० बी अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. कानपूरचे एसएसपी दिनेश कुमार यांनी ही माहिती दिली.

अमर दुबेचा खात्मा
उत्तर प्रदेशातील आठ पोलिसांच्या हत्येला जबाबदार असणारा कुख्यात गुंड विकास दुबे याचा जवळचा सहकारी अमर दुबे याला पोलिसांनी ठार केलं आहे. बुधवारी सकाळी उत्तर प्रदेश पोलिसांच्या विशेष पथकाने हमिदपूर जिल्ह्यात झालेल्या चकमकीत अमर दुबेला ठार केलं. विशेष पथकाचे महानिरीक्षक अमिताभ यश यांनी ही माहिती दिली आहे. अमर दुबे एक फरार आरोपी होता.

विकास दुबेच्या टोळीकडून आठ पोलिसांची गोळीबार करुन हत्या करण्यात आली होती. या प्रकऱणात अमर दुबेदेखील आरोपी होता. पोलिसांना मोस्ट-वॉण्टेड आरोपींची एक यादी काढली असून यामध्ये अमर दुबेचं नाव पहिल्या क्रमांकावर होतं.