विमानाद्वारे नजर ठेवल्याचा आरोप अमेरिकेने फेटाळला

भारताने  ए-सॅटची (उपग्रहभेदी क्षेपणास्त्र)चाचणी केल्याच्या प्रक्रियेची  विमान पाठवून टेहळणी केल्याचा आरोप अमेरिकेने फेटाळून लावला आहे. अमेरिकेने हिंदी महासागरातील दिएगो गार्सिया बेटावरून एक विमान पाठवून भारताच्या उपग्रहभेदी क्षेपणास्त्र चाचणीची टेहळणी केल्याच्या बातम्या आल्या आहेत त्याबाबत हे स्पष्टीकरण करण्यात आले. भारताच्या उपग्रहभेदी क्षेपणास्त्राच्या चाचणीची माहिती आधीच होती, हे मात्र अमेरिकेने मान्य केले आहे.

अमेरिकेच्या संरक्षण खात्याचे प्रवक्ते लेफ्टनंट कर्नल डेव्हीड इस्टबर्न यांनी सांगितले, की अमेरिकेच्या विमानाने या चाचणीवर हेरगिरी करीत लक्ष ठेवले हे खरे नाही. उलट अमेरिका भारताशी संरक्षण सहकार्य वाढवण्याच्या प्रयत्नात आहे. तसेच दोन्ही देशांचे आर्थिक संबंध चांगले आहेत.

एअरक्राफ्ट स्पॉटस या लष्करी हालचालीवंर लक्ष ठेवणाऱ्या संस्थेने असे म्हटले होते, की अमेरिकी हवाई दलाने दिएगो गार्सिया बेटावरून एक विमान भारताच्या क्षेपणास्त्र चाचणीवर हेरगिरी करण्यासाठी पाठवले होते, हे विमान त्या  बेटावरून उडाले व बंगालच्या उपसागराकडे गेले, त्या वेळी भारताच्या चाचणीवर टेहळणी करण्यात आली. भारताच्या एसॅट चाचणीवर टेहळणी करून  माहितीचे विश्लेषण करण्यात आले.

एअर फोर्स स्पेस कमांडचे कमांडर लेफ्टनंट जनरल डेव्हीड डी थॉमसन यांनी सांगितले की, अमेरिकेला भारताच्या ए-सॅट या चाचणीची माहिती होती. कारण भारताने आधीच विमानांना येण्यास बंदी घातली होती. त्यामुळे भारत चाचणी करीत असल्याचे समजले होते. युरोपीय प्रमाणवेळेनुसार पहाटे १.३९ वाजता ही चाचणी झाली. बकले येथील एअर फोर्स मिसाइल वॉर्निग सिस्टीम व तेथील लोकांना ही चाचणी झाल्याचे लगेच समजले होते.

‘हेरगिरी केली नसती तरच नवल’

हार्वर्डच्या स्मिथसॉनियन सेंटर फॉर अ‍ॅस्ट्रोफिजिक्स या संस्थेचे खगोलवैज्ञानिक जोनाथन मॅकडोवेल यांनी सांगितले, की अमेरिकी गुप्तहेरांना या चाचणीची आधीच माहिती होती एवढाच याचा अर्थ आहे. काही प्रमाणात अमेरिकेने भारतावर हेरगिरी केली असेही यातून सूचित होत आहे. प्रत्येक देश मित्र व शत्रू देशांवर हेरगिरी करीतच असतो. आजच्या काळात ती जगाची रीत आहे. अमेरिकेने जर अशी हेरगिरी केली नसती तरच नवल होते. त्यामुळे अमेरिकेला या चाचणीची आधीच माहिती होती. अमेरिकेने दूरसंवेदक उपकरणे असलेले विमान हेरगिरीसाठी पाठवले असेल तरी मला त्यात वेगळे वाटत नाही, असे ते म्हणाले, मात्र पेंटॅगॉनने हेरगिरीच्या आरोपाचा इन्कार केला आहे. दोन्ही देश एकमेकांचा आदर करतात व आंतरराष्ट्रीय निकषांचे पालन करण्यास ते बांधील आहेत असे व्हाइट हाऊसचे इस्टबर्न यांनी सांगितले.