मध्य प्रदेशातील व्यापम घोटाळ्यात एक नवे वळण आले असून, विशेष कामगिरी गटाने वनसंरक्षक भरती प्रकरणात दाखल केलेल्या एफआयआरमध्ये ‘मंत्राणी’ असे एक सांकेतिक नाव आले आहे. हे नाव एखाद्या महिला मंत्र्याचे असावे किंवा मंत्र्याच्या पत्नीचे असावे असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
काँग्रेसने याबाबत विशेष कामगिरी दलाने मंत्राणीचे नाव उघड करून कारवाई का केली नाही, असा सवाल केला आहे. व्यापमचा माजी नियंत्रक व आरोपी पंकज त्रिवेदी याने चौकशी संस्थेला मंत्राणीबाबत पहिल्यांदा सांगितले, पण मंत्राणी कोण आहे मंत्र्याची पत्नी की महिला मंत्री हे सांगण्यात आले नाही, असे काँग्रेसचे प्रवक्ते के. के. मिश्रा यांनी सांगितले.
त्रिवेदी यांचा रोख नेमका कोणावर आहे हे समजू शकलेले नाही. याच एफआयआरमध्ये राज्यपाल रामनरेश यादव यांचे नाव आरोपी म्हणून दहाव्या क्रमांकावर होते, पण ते काढण्यात आले. राज्यपालांवर पद सोडल्याशिवाय गुन्हा दाखल करता येत नाही. व्यापम आणि डीएमएटी घोटाळ्याच्या मुद्दय़ावर राज्यपाल यादव व मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी राजीनामा द्यावा, तसेच दंत आणि वैद्यकीय प्रवेश परीक्षेच्या अनियमिततांची सीबीआयमार्फत चौकशी करावी, अशी मागणी आम आदमी पक्षाने केली आहे.