पाकिस्ताननजिकच्या वाघा सीमेवर रविवारी शक्तिशाली बॉम्बस्फोट झाल्यानंतर भारताने सोमवारी आपल्या हद्दीत लहान प्रमाणात ध्वजसलामीचा कार्यक्रम केला. या स्फोटात ६१ जण ठार झाले आहेत.
या स्फोटानंतर ध्वजसलामीचा कार्यक्रम तीन दिवस स्थगित करण्यासंबंधी पाकिस्तानने रविवारी रात्री उशिरा भारतास विनंती केली होती. त्यानंतर भारताने त्यास प्रतिसाद दिला. मात्र, सोमवारी दुपारी चारच्या सुमारास पाकिस्तानच्या रेंजर्सनी ध्वजसलामीचा कार्यक्रम पुन्हा सुरू करण्याची विनंती केली होती. मात्र त्यावेळेपर्यंत पूर्ण क्षमतेने हा कार्यक्रम पार पडणे कठीण असल्यामुळे लोकांशिवाय तो लहान प्रमाणात पार पडल्याचे सीमा सुरक्षा दलाचे प्रमुख डी. के. पाठक यांनी सांगितले. मंगळवारपासून हा कार्यक्रम नेहमीसारखा सुरू होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. मंगळवारपासून सुरू होणाऱ्या कार्यक्रमापासून सुरक्षा व्यवस्था अधिक व्यापक करण्यात येईल. तेथे येणारे नागरिक तसेच पर्यटकांच्या सुरक्षेची अधिक काळजी घेण्यात येणार असल्याचे पाठक म्हणाले.दरम्यान, पाकिस्ताननेही सोमवारी ध्वजसलामीच्या कार्यक्रमासाठी सामान्य लोकांना तेथे येण्यास अनुमती दिली होती.