News Flash

ISRO पीएसएलव्ही सी-३७ यानाचा सेल्फी व्हिडिओ पाहिलात का?

उपग्रह पृथ्वीच्या कक्षेत सोडण्याची थरारक प्रक्रिया पाहण्याची संधी

ISRO releases stunning selfie footage PSLV C37 rocket launch : श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रावरून पीएसएलव्ही सी-३७ ने उड्डाण केले तेव्हाचा क्षण संपूर्ण देशासाठी अभिमानाचा होता. अनेकजण हा क्षण पाहण्यासाठी टीव्हीला डोळे लावून बसले होते.

भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) बुधवारी एकाचवेळी १०४ उपग्रह अवकाशात प्रक्षेपित करत नवा इतिहास रचला होता. इस्रोने विकसित केलेल्या पीएसएलव्ही सी-३७ या प्रक्षेपकाच्या सहाय्याने हे उपग्रह अवकाशात सोडण्यात आले. श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रावरून पीएसएलव्ही सी-३७ ने उड्डाण केले तेव्हाचा क्षण संपूर्ण देशासाठी अभिमानाचा होता. अनेकजण हा क्षण पाहण्यासाठी टीव्हीला डोळे लावून बसले होते. इस्रोची ही ‘न भूतो न भविष्यती’ कामगिरी अनेक भारतीयांनी पाहिली. मात्र, सध्या सोशल मीडियावर पीएसएलव्ही सी-३७ च्या लाँचिंगचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. इस्रोकडून पीएसएलव्ही सी-३७ च्या लाँचिंगचा हा सेल्फी व्हिडिओ प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्यानंतर सेल्फीप्रेमींकडून या व्हिडिओला मोठ्याप्रमाणावर प्रसिद्धी मिळत आहे. या व्हिडिओमध्ये आकाशात झेप घेण्यापासून ते अवकाशात पोहचल्यानंतर एक-एक उपग्रह पृथ्वीच्या कक्षेत कसा सोडण्यात येतो, हा संपूर्ण प्रवास पाहायला मिळत आहे. उपग्रह पृथ्वीच्या कक्षेत सोडण्याची थरारक प्रक्रिया पाहण्याची संधी ‘इस्रो’ने व्हिडिओद्वारे दिली आहे.

आतापर्यंत भारताने परदेशांचे १८० उपग्रह अवकाशात सोडले आहेत. यामधील १०४ उपग्रह भारताने बुधवारी अवकाशात सोडले. बुधवारी भारताने अवकाशात सोडलेल्या १०४ उपग्रहांपैकी फक्त ३ उपग्रह भारतीय होते, तर इतर उपग्रह परदेशांचे होते. इतर देशांचे १०१ उपग्रह सोडल्यामुळे या मोहिमेचा निम्मा खर्च वसूल होईल, असा अंदाज इस्रोने व्यक्त केला आहे. विशेष म्हणजे एकाचवेळी तब्बल १०४ उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण केल्याने इस्रो ही जगातील सर्वात यशस्वी अंतराळ संस्था झाली आहे. यासोबतच बुधवारी १०१ उपग्रहांचे प्रक्षेपण करुन इस्रो सर्वाधिक परदेशी उपग्रहांचे प्रक्षेपण करणारी संस्था झाली आहे.

इस्रोने १९९९ पासून व्यावसायिक शाखेच्या मदतीने परदेशी उपग्रह अवकाशात सोडण्याचा कार्यक्रम सुरू केला. २०१६ मध्ये इस्रोने इतर देशांचे २२ उपग्रह प्रक्षेपित केले होते. सध्याच्या घडीला इस्रोकडून अमेरिकेचे सर्वाधिक उपग्रह अवकाशात सोडले जात आहेत. भारताने अमेरिकेचा पहिला उपग्रह २०१५ मध्ये अवकाशात प्रक्षेपित केला होता. आतापर्यंत भारताने अमेरिकेचे ११४ उपग्रह प्रक्षेपित केले आहेत. बुधवारी इस्रोने इतर देशांचे १०१ उपग्रह प्रक्षेपित केले. त्यापैकी ९६ उपग्रह अमेरिकेचे होते. अमेरिकेनंतर कॅनडाचे सर्वाधिक उपग्रह इस्रोकडून प्रक्षेपित करण्यात आले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 17, 2017 8:00 am

Web Title: watch isro releases stunning selfie footage of what happened after pslv c37 rocket launch
Next Stories
1 सरकारला निर्देश देण्यास सांगणारी याचिका न्यायालयाने फेटाळली
2 नोटाबंदीचा निर्णयच चुकीचा: बजाज
3 तिहेरी तलाकबाबतच्या याचिकांच्या सुनावणीसाठी ५ सदस्यांचे घटनापीठ
Just Now!
X