कर्नाटकमध्ये जी राजकीय अस्थिरता निर्माण झाली आहे त्या अस्थिरतेचा निषेध करत युवक काँग्रेसने पश्चिम बंगालमध्येही आंदोलन केलं. कोलकाता या ठिकाणी युवक काँग्रेसने निषेध आंदोलन करत भाजपाचा निषेध नोंदवला. या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. भाजपा घोडेबाजाराला प्राधान्य देत आहे या आशयाचे फलक घेऊन हे आंदोलन करण्यात आलं. मागच्या शनिवारी कर्नाटकात राजकीय भूकंप झाला.

 

काँग्रेसच्या ८ आणि जेडीएसच्या ३ आमदारांनी राजीनामा दिला. त्यानंतर कर्नाटकमध्ये राजकीय उलथापालथ सुरु झाली. कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामी तातडीने रविवारी अमेरिकेहून कर्नाटकला परतले. मागील सोमवारी म्हणजेच ८ जुलैला कर्नाटक सरकारमध्ये सहभागी असलेल्या सगळ्या काँग्रेसच्या नेत्यांनी राजीनामा दिला. कर्नाटक सरकारमध्ये अस्थिरता निर्माण करण्यासाठी भाजपा जबाबदार आहे. हे सगळे काही मोदी आणि शाह यांच्या सांगण्यावरून झाले आहे असा आरोप काँग्रेसने केला आहे. आज लोकसभेच्या बाहेरही काँग्रेसने आंदोलन केलं. मात्र भाजपाने हे सगळे आरोप फेटाळले आहेत. काँग्रेसच्या घरातलं भांडण काँग्रेसला सोडवता येत नाही आणि ते आम्हाला दोष देत आहेत असं प्रत्युत्तर भाजपाने दिलं आहे. दरम्यान कोलकाता येथेही या राजकीय अस्थिरतेचे पडसाद उमटल्याचे पाहण्यास मिळाले.