नवी दिल्ली विमानतळावर एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याबरोबर एका महिलेने गैरवर्तन केल्याचा प्रकार समोर आला आहे. विमान निघून गेल्यामुळे चिडलेल्या महिलेने कर्मचाऱ्याबरोबर वाद घालण्यास सुरूवात केली. वाद इतका विकोपाला गेला की त्या महिलेने रागाच्या भरात त्या कर्मचाऱ्याच्या कानशिलात लगावली. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि सुरक्षा रक्षक तिथे आले. त्यानंतर हे प्रकरण मिटवण्यात आले.

दरम्यान, या महिलेविरोधात कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्याचे सांगण्यात येते. एअर इंडियातील सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित महिला ही हरियाणातील पंचकुला शहरात राहणारी आहे. ही घटना मंगळवारी घडली. अधिकाऱ्याने सांगितलेल्या माहितीनुसार एका महिला प्रवासीला दिल्लीतून अहमदाबादला जायचे होते. ती उशिराने विमानतळावर पोहोचली होती. त्यामुळे या महिलेचे विमान चुकले. ही गोष्ट त्या महिलेला समजताच ती काऊंटरवरील व्यवस्थापकाशी वाद घालू लागली. सुरूवातीला कर्मचाऱ्यांनी तिला समजवण्याचा प्रयत्न केला. पण ती ऐकण्यास तयारच नव्हती. प्रकरण हातघाईवर आले आणि याच दरम्यान त्या महिलेने त्या कर्मचाऱ्याच्या श्रीमुखात लगावली. त्यानंतर एअर इंडियाच्या इतर अधिकाऱ्यांना याबाबत समजले.

घटनास्थळी त्वरीत सुरक्षा कर्मचारी आणि पोलिसांनी धाव घेतली. त्यांनी मध्यस्थी करून महिलेला समजावले आणि वाद संपवला. ही महिला उशिराने विमानतळावर पोहोचली होती, असे एअर इंडियाचे म्हणणे आहे. ही महिला विमान गेल्यामुळे काऊंटरवर गोंधळ घालत होती. त्यानंतर हे प्रकरण चिघळले होते. परंतु, हे प्रकरण आता संपवण्यात आल्याचेही एअर इंडियाने म्हटले आहे. यापूर्वी शिवसेनेचे खासदार रवींद्र गायकवाड यांनीही एअर इंडियाच्या एका अधिकाऱ्यांना मारहाण केली होती. हे प्रकरण त्यावेळी खूप गाजले होते. संसदेत याप्रकरणी गोंधळ झाला होता. त्यानंतर गायकवाड यांना एअर इंडियाच्या विमानातून प्रवास करण्यास मज्जावही करण्यात आला होता.