आपातकालीन परिस्थितीत कसं बाहेर पडावं याचं प्रात्यक्षिक देत असताना १९ वर्षीय विद्यार्थ्यीनीचा कॉलेजच्या इमारतीतून पडून मृत्यू झाला आहे. ही विद्यार्थ्यींनी इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून खाली उडी मारण्यास तयार नव्हती. मात्र बळजबरीनं ट्रेनरनं तिला खाली ढकललं यावेळी छताला डोकं आपटून तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. या प्रकरणात कोईंबतूर पोलिसांनी ट्रेनरला ताब्यात घेतलं आहे. कोईंबतूरमधल्या कोवाई कलाईमगल कॉलेज ऑफ आर्ट अँड सायन्समध्ये ही दुर्दैवी घटना घडली आहे.

कॉलेजमधल्या मॉक ड्रिलचे व्हिडिओ पोलिसांच्या हाती लागले आहेत. कॉलेजमध्ये आपातकालीन परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी प्रात्यक्षिक सुरू होतं. राष्ट्रीय आपातकालीन व्यवस्थापनाकडून हे प्रात्यक्षिक घेण्यात आलं होतं. यावेळी अनेक विद्यार्थी कॉलेजच्या तिसऱ्या मजल्यावर जमले होते. या विद्यार्थ्यांना इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून खाली उडी मारण्याचं प्रशिक्षण ट्रेनर देत होते. तसेच उडी मारणाऱ्या मुलांना झेलायला जाळी पकडून काही विद्यार्थी खाली उभे होते.

पाच विद्यार्थ्यांनी यशस्वीरित्या हे प्रात्यक्षिक पार पाडलं. मात्र १९ वर्षीय बीबीएची विद्यार्थ्यीनी एन लोगेश्वरी या प्रात्यक्षिकासाठी तयार नव्हती. इमारतीवरून उडी मारण्याची तिला भीती वाटत होती. पण ट्रेनरनं तिला कोणताही विचार न करता तिसऱ्या मजल्यावरून ढकलून दिलं. यावेळी लोगेश्वरीच्या डोक्याला भिंतीचा मार बसल्यानं गंभीर दुखापत झाली. त्यानंतर तिला तातडीनं कोईंबतूर सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र उपचारापूर्वीच तिला मृत घोषीत करण्यात आलं. या प्रकरणात ट्रेनरला अटक करण्यात आली आहे.