ग्राहकांना VIP फोन नंबर देण्याचं आश्वासन देऊन ऑनलाईन गंडा घालणाऱ्या टोळीला अहमदाबाद पोलिसांनी अटक केली आहे. या टोळीने अहमदाबाद शहरातील एका डॉक्टरला व्हीआयपी नंबर मिळवून देतो असं सांगत ५९ हजार रुपये उकळले होते. मात्र आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच डॉक्टरने पोलिसांत तक्रार दाखल केली. तपासाअंती पोलिसांनी याप्रकरणी तिघांना अटक केली असून ही टोळी २०१८ पासून हे रॅकेट चालवत असल्याचं समोर आलंय.

अहमदाबाद शहरातील अदानी शांतीग्राम भागात राहणाऱ्या डॉ. विश्वमोहन ठाकूर यांनी १३ जूनरोजी अहमदाबाद पोलिसांच्या सायबर शाखेकडे आपली फसवणूक झाल्याची तक्रार दाखल केली होती. या तक्रारीत व्हीआयपी नंबर मिळवून देतो असं सांगत आपल्याकडून जानेवारी महिन्यात ५९ हजार रुपये घेण्यात आले. आरोपींनी डॉ. ठाकूर यांना आपण Airtel कंपनीचे कर्मचारी असल्याचं सांगितलं होतं. आरोपींनी गुन्हा करण्यासाठी एक विशेष पद्धत आजमावली होती. “तुम्हाला व्हीआयपी नंबर हवा असल्यास एअरटेल कंपनीतील वरुण नावाच्या अधिकाऱ्याला संपर्क साधा. अर्थात वरुण हे नाव खोटं असायचं. जेव्हा एखादा व्यक्ती या टोळीच्या जाळ्यात अडकायचा त्यावेळी त्याचा विश्वास मिळवण्यासाठी हे आरोपी त्याला कंपनीचं बिल पाठवायचे. यानंतर पैसे मिळाल्यानंतर कोणत्याही ग्राहकाला व्हीआयपी नंबरचं सीमकार्ड मिळायचं नाही. या रॅकेटमध्ये मुंबईतील काही लोकं सहभागी असल्याचं आम्हाला समजलं आहे. प्रत्येक ग्राहकामागे मुंबईतील व्यक्तींना त्यांचा हिस्सा मिळायचा.” अहमदाबाद सायबर शाखेच्या अधिकाऱ्याने माहिती दिली.

पोलिसांनी या प्रकरणात विजय राठोड, प्रशांत जोशी आणि जिग्नेश कारिया यांना अटक केली आहे. डिसेंबर २०१८ पासून हे तिघे हे रॅकेट चालवत होते. प्रत्येक ग्राहकामागे तिघांचा हिस्सा ठरलेला असायचा. अटकेत असलेल्या आरोपींपैकी जिग्नेश हा HDFC बँकेत सेल्स विभागात आणि एअरटेलमध्ये पोस्टपेड व्हेरिफीकेशन विभागात काम करत होता. ग्राहकांना बँक खात्याची माहिती द्यायची हे काम जिग्नेशकडे होतं. आतापर्यंत जिग्नेशने या रॅकेटमधून ४-५ लाखांची कमाई केल्याचं पुढे आलंय. विजय राठोड आणि प्रशांत जोशी यांनाही प्रत्येक ग्राहकामागे ठरलेला हिस्सा मिळायचा.