मुंबई आणि दिल्लीमध्ये करोना व्हायरसच्या विळाखा दिवसागणिक वाढतच आहे. राजधानी दिल्लीमध्ये एकाच इमारतीमधील ४१ जणांना करोनाचा संसर्ग झालाय. एकाच इमारतीत इतके रूग्ण आढळल्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झाले आहे.

राजधानी दिल्लीच्या दक्षिण पश्चिमी भागात कापसहेडा येथील एका इमारतीत १८ एप्रिल रोजी एक व्यक्ती करोनाग्रस्त आढळला होता. त्यानंतर इमारतीमधील सर्वांची करोना टेस्ट करण्यात आली. एक दोन नव्हे तब्बल ४१ जणांना करोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आले. त्यानंतर या इमारतीला सॅनेटाझर करून सील करण्यात आलं होतं.  हा दाटीवाटीचा परिसर असून करोनाग्रस्त आढळलेल्या इमारतीत एकूण १७५ घरं आहेत. त्यामधील ४१ जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

दिल्लीत दोन आठवड्यात CRPF च्या १२२ जणांना करोना
राजधानी दिल्लीमध्ये आज केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (सीआरपीफ) आणखी १२ जवानांना करोना विषाणूची लागण झाली आहे. दिल्लीमध्ये एकूण करोना झालेल्या सीआरपीएफच्या जवानांची संख्या १२२ झाली आहे. मागील दोन आठवड्यात १२२ सीआरपीएफच्या जवानांना करोना झाला आहे. दरम्यान आणखी १५० जणांचे रिपोर्ट्स येणे अद्याप बाकी आहेत. त्यामुळे संख्या अद्याप वाढण्याची शक्यता आगे. खबरदारीचा उपाय म्हणून संपुर्ण बटालियनला क्वारंटीन करण्यात आले आहे.

दरम्यान, देशात करोनाचा संसर्ग दिवसागणिक वाढतच आहे. आतापर्यंत देशात १२३८ जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये देशात १५ ते १९०० करोनाग्रस्त आढळून येत होते. पण गेल्या २४ तासांमध्ये करोनाचे २२९३ नवीन रूग्ण आढळून आले आहेत. तर दिवसभरात ७१ जणांचा मृत्यू झाला आहे.