पीटीआय, नवी दिल्ली

लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात देशभरातील ५८ मतदारसंघांत शनिवारी ५९.९२ टक्के मतदान झाले. सर्वाधिक मतदान पश्चिम बंगालमध्ये ७८.२७ टक्के झाले, तर जम्मू-काश्मीरमध्ये सर्वात कमी ५३.३८ टक्के मतदान झाले. काश्मीरमध्ये कमी मतदान झाले असले तरी गेल्या ४० वर्षांतील हे सर्वाधिक मतदान असल्याचे निवडणूक आयोगाकडून सांगण्यात आले.

लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात सहा राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशांतील ५८ मतदारसंघांमध्ये मतदान झाले. भाजप उमेदवारावर कथित हल्ला, किरकोळ चकमकी व निदर्शने यांसह हिंसाचाराच्या घटना पश्चिम बंगालमध्ये नोंदवण्यात आल्या. दिल्लीमध्ये काही ठिकाणी ईव्हीएममध्ये बिघाड झाला़ कोलकातामध्ये भाजप उमेदवार व कलकत्ता उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश अभिजीत गंगोपाध्याय हे जेव्हा मतदान केंद्रावर पोहोचले, त्यावेळी काही जणांनी त्यांच्याविरोधात घोषणा दिल्या.

हेही वाचा >>>श्रीलंकन सरकार ४३ पाकिस्तानी कैद्यांना मुक्त करून मायदेशी पाठवणार, दोन्ही देशांमध्ये मोठा करार

काश्मीरमध्ये ४० टक्के स्थलांतरित काश्मिरी पंडितांनी मतदानाचा हक्क बजावला, असे निवडणूक आयोगाकडून सांगण्यात आले.मतदानाच्या सातव्या आणि अखेरच्या टप्प्यात १ जून रोजी मतदान होणार आहे. या टप्प्यात ५७ मतदारसंघांतील मतदार मतदानाचा हक्क बजावतील.

जम्मूकाश्मीरमध्ये सीमेवरील गांवामध्ये शांततेत मतदान

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेपासून (एलओसी) अगदी काही मीटर अंतरावर असलेल्या राजौरी जिल्ह्यातील गावांमध्ये शांततेत मतदान झाले. सेहर व माकरी या गावांमध्ये मतदान केंद्रे उभारण्यात आली होती. सीमेपलीकडून गोळीबाराची भीती न बाळगता आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. ‘‘पाकिस्तानकडून होणाऱ्या गोळीबारामुळे आम्ही सर्वात वाईट काळ पाहिला आहे. आमची एकच प्रार्थना आहे की सीमेवर शांततापूर्ण वातावरण असावे,’’ असे माकरी गावातील वेद प्रकाश यांनी मतदान केल्यानंतर सांगितले.

४० वर्षांनंतर सर्वाधिक मतदान

जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग-राजौरी मतदारसंघात शनिवारी ५३.३८ टक्के मतदान झाले. ४० वर्षांतील हे सर्वाधिक मतदान असल्याचे निवडणूक आयोगाने सांगितले. राजौरी विधानसभा विभागात सर्वाधिक ६७.०९ टक्के मतदान झाले, तर नौशेरा येथे ६५.४७ टक्के मतदान झाले. जुन्या अनंतनाग लोकसभा मतदारसंघात २०१९ मध्ये सुमारे नऊ टक्के मतदान झाले होते, तर २०१४ मध्ये २९ टक्क्यांच्या जवळपास होते. ४० टक्के स्थलांतरित काश्मिरी पंडितांनी मतदानाचा हक्क बजावला.