श्रीलंका सरकार त्यांच्या तुरुंगांमध्ये शिक्षा भोगत असलेल्या ४३ पाकिस्तानी कैद्यांना मुक्त करणार आहे जेणेकरून ते त्यांच्या मायदेशी परतू शकतील. एकमेकांच्या तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांच्या घरवापसीसाठी दोन्ही देशांच्या सरकारांनी एक सामंजस्य करार केला आहे. त्याअंतर्गत श्रीलंका ४३ पाकिस्तानी कैद्यांना मुक्त करणार आहे. डॉन या पाकिस्तानी वृत्तपत्राने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. या वृत्तानुसार पाकिस्तानचे गृहमंत्री मोहसिन नकवी यांनी शुक्रवारी (२४ मे) श्रीलंकेचे उच्चायुक्त अ‍ॅडमिरल (सेवानिवृत्त) रवींद्र चंद्र श्रीवजय गुणरत्ने यांच्याबरोबर एक बैठक केली. या बैठकीत दोन्ही देशांमध्ये कैद असलेल्या एकमेकांच्या नागरिकांच्या सुटकेबाबत चर्चा झाली. यी चर्चेअंती श्रीलंकेने ४३ पाकिस्तानी कैद्यांना मुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे.

पाकिस्तानी गृहमंत्री आणि श्रीलंकेच्या उच्चायुक्तांमध्ये झालेल्या बैठकीत दोन्ही बाजूंनी परस्पर हितसंबंध, मैत्री आणि द्विपक्षीय संबंध आणखी विकसित करण्याच्या मुद्द्यांवर चर्चा झाली. दोन्ही देशांची सुरक्षा, सागरी सुरक्षा आणि अंमली पदार्थविरोधी क्षेत्रात सहकार्य वाढवण्यासाठी दोन्ही बाजूच्या प्रतिनिधींनी सहमती दर्शवली. पाकिस्तानचं गृहमंत्रालय ४३ पाकिस्तानी कैद्यांना परत आणण्यासाठी गेल्या महिन्यापासून श्रीलंकेच्या अधिकाऱ्यांबरोबर चर्चा करत होतं. या चर्चा आता यशस्वी झाल्या आहेत.

हे ही वाचा >> स्वतःची अधुरी प्रेमकहाणी सांगत कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांकडून तरुणांना आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन; म्हणाले, “मी महाविद्यालयात…”

श्रीलंकेतील एका न्यायालयाने अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या १० पाकिस्तानी नागरिकांना नुकतीच शिक्षा सुनावली आहे. श्रीलंकेत ते मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थांची तस्करी करत होते. श्रीलंकेतील अंमली पदार्थ विरोधी पथकाने यांना पकडून सर्व पुरावे न्यायालयासमोर सादर केले. त्यानंतर श्रीलंकन न्यायालयाने त्यांना १०-१० वर्षांची शिक्षा सुनावली होती. या १० जणांनी त्यांच्या गुन्ह्याची कबुली देखील दिली होती. ते आता तुरुंगात शिक्षा भोगत आहेत.