कर्नाटकमध्ये राज्यसभेसाठी  अधिकृत उमेदवारांऐवजी काँग्रेस उमेदवाराला मतदान करणाऱ्या ८ आमदारांवर धर्मनिरपेक्ष जनता दलाने निलंबनाची कारवाई केली. बंडखोर आमदारांमुळे पक्षाचे उमेदवार बी. एम. फारुक यांचा पराभव झाला होता. धर्मनिरपेक्ष राष्ट्रीय जनता दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष  एच.डी. देवेगौडा यांनी आठही आमदारांना निलंबित केल्याचे सांगितले. या आठही आमदारांच्या चौकशीसाठी त्रिसदस्यीय समिती स्थापन करण्यात येणार आहे. शनिवारी राज्यसभेच्या जागांसाठी झालेल्या मतदानाच्या वेळी जनता दलच्या या आमदारांनी काँग्रेस उमेदवारांना मते दिली. जमीर अहमद खान, चालुवराय स्वामी, इक्बाल अन्सारी, बालकृष्णा, रमेश बंदीसीदेगौडा, गोपालाय, भीमा नायक आणि अखंड श्रीनिवास मूर्ती यांनी काँग्रेस उमेदवार के.सी. राममूर्ती यांना मते दिली. त्यामुळे या आमदारांवर बेशिस्तीची कारवाई करण्यात आली. कर्नाटकमधून केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन, जयराम रमेश, ऑस्कर फर्नाडिस आणि के. सी. राममूर्ती यांनी विजय मिळविला आहे.