‘हाउडी मोदी’ कार्यक्रमासाठी ह्यूस्टन येथे आलेल्या पंतप्रधान मोदींचे तेथील भारतीय नागरिकांच्या विविध गटांनी अतिशय उत्साहात स्वागत केले. येथील एनआरजी स्टेडिअमवर पंतप्रधान मोदींचा कार्यक्रम होणार आहे. तेथील काश्मिरी पंडितांच्या शिष्टमंडळाने देखील पंतप्रधान मोदींची भेट घेतली. यावेळी कलम ३७० हटवल्याबद्दल पंतप्रधान मोदींचे त्यांनी विशेष आभार व्यक्त केले.
या शिष्टमंडळातील सदस्या सुरींदर कौल यांनी याबाबत एएनआयला माहिती दिली. त्या म्हणाल्या पंतप्रधान मोदी आम्हाला म्हणाले की, तुम्ही खूप सहन केले आहे. आता आपल्याला मिळून नव्या काश्मीरची उभारणी करायची आहे. या क्षणी सर्व प्रतिनिधी भावूक झाले होते. ३७० कलम रद्द केल्याबद्दल मोदींचे आभार मानताना एका प्रतिनिधीने मोदींच्या हाताचे चुंबन घेतले आणि म्हणाला की, या ऐतिहासिक निर्णयाबद्दल आम्ही सात लाख काश्मिरी पंडितांच्यावतीने आपले आभार व्यक्त करतो, धन्यवाद. पंतप्रधान मोदींनी देखील शिष्टमंडळाची आपुलकीने चौकशी केली. तसेच, यावेळी आम्ही पंतप्रधान मोदींना विश्वास दिला की, आपले शांततामय, विकासाने परिपूर्ण व ज्या ठिकाणी सर्व नागरिक आनंदी आहेत, अशा काश्मीरचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी आमचा सर्व समाज सरकारबरोबर काम करण्यास तयार आहे. काश्मिरी पंडितांनी ‘नमस्ते शारदा देवी’ श्लोक म्हटला. या श्लोकनंतर मोदींनी ”अगेन नमो नम:” असे म्हटल्यावर सर्वजण दिलखुलास हसले.
#WATCH United States: A delegation of Kashmiri Pandits meets and interacts with Prime Minister Narendra Modi. A member kisses PM Modi’s hands and says, “Thank you on behalf of 7 Lakh Kashmiri Pandits.” pic.twitter.com/8xKBqNlOvM
— ANI (@ANI) September 22, 2019
याप्रसंगी शीख समुदायाच्यावतीने देखील कलम ३७० रद्द केल्याबद्दल आणि करतारपुर कॉरिडोरसाठी मोदी यांचे आभार मानले गेले. तसेच विविध मागण्यासंदर्भात निवेदनंही सादर केले गेले. यावेळी दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नाव बदलून गुरुनानक देव करण्याचीही मागणी करण्यात आली. तर कॅलिफोर्नियातील अर्विन येथील आयुक्त अरविंद चावला म्हणाले की, शीख समाजासाठी केलेल्या कामांसाठी आम्ही मोदींचे आभार मानले. ‘ हाउडी मोदी शो’मध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प हजर राहणार आहेत, यावरून सिद्ध होते की मोदी किती मोठे नेते आहेत. यावेळी बोहरा समाजाच्या प्रतिनिधी मंडळानेही मोदींचे स्वागत केले. ‘टेक्सास इंडिया फोरम’च्यावतीने ‘हाउडी मोदी’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे.