देशातील अनेक ठिकाणी प्रसिद्ध दुकानं किंवा हॉटेलमध्ये मिळणाऱ्या खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेवर अनेकदा प्रश्न उपस्थित झाले आहेत. राजधानी दिल्लीमध्ये ताजी घटना घडली आहे. दिल्ली मेट्रोच्या राजीव चौक स्थानकावर बर्गरकिंग या प्रसीद्ध आउटलेटमधील बर्गरमध्ये प्लास्टिकचा तुकडा सापडला. बर्गर खाताना प्लास्टिक गिळल्यामुळे एका व्यक्तीच्या गळ्याला इजा झाली आणि त्याला रुग्णालयात दाखल करावं लागलं.

वृत्तसंस्था एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, राकेश कुमार नावाच्या एका व्यक्तीने राजीव चौक स्थानकावर बर्गरकिंग या प्रसिद्ध आउटलेटमधून चीझ व्हेज बर्गर खरेदी केलं. बर्गर खात असताना यामध्ये काहीतरी वेगळं असल्याचं त्याला जाणवत होतं. बर्गर खाल्ल्यानंतर लगेचच त्याच्या पोटात दुखायला लागलं आणि त्याने आउटलेटमधील शीफ्ट मॅनेजरला याबाबत माहिती दिली. त्यानंतर राकेश कुमारला रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

१३ मे रोजीची ही घटना असून राकेशच्या तक्ररीनंतर पोलिसांनी मॅनेजरला अटक केली होती, त्यानंतर त्याची जामिनावर सुटका झाली आहे. बर्गरमध्ये एक प्लास्टिकचा तुकडा होता. राकेशच्या अन्ननलिकेत हा तुकडा अडकल्याने त्याला इजा झाली. रुग्णालयात उपचारानंतर डॉक्टरांनी त्याला डिस्चार्ज दिला, अशी माहिती पोलिसांनी दिली.