दिल्ली सरकारचे मुख्य सचिव अंशु प्रकाश यांच्याशी केलेली गैरवर्तणूक आणि मारहाणप्रकरणी आम आदमी पक्षाचे आमदार प्रकाश जरवाल यांना पोलिसांनी अटक केली. मुख्य सचिव अंशु प्रकाश यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली होती. त्यानंतर दिल्ली पोलिसांनी रात्री उशिरा प्रकाश जरवाल यांना अटक केली. प्रकाश जरवाल यांच्या अटकेनंतर आपचे आमदार अमानतुल्ला खान यांच्या ओखला येथील घरी रात्री उशिरा पोलीस दल तैनात करण्यात आले.

अंशु प्रकाश यांच्या तक्रारीत दुसरे नाव अमानतुल्ला यांचेही असून तेच मुख्य आरोपी आहेत. आपचे नेते प्रेम चौहान यांच्या मते, जरवाल आपल्या सहकाऱ्यांबरोबर एका लग्न समारंभात सहभागी होण्यासाठी जात होते. दिल्ली पोलिसांनी त्यांना रात्री सुमारे ११ च्या सुमारास खानपूर येथे वाहतूक सिग्नलला थांबवून अटक केली. पोलिसांनी जरवाल यांना ताब्यात घेतले आणि त्यांच्या इतर सहकाऱ्यांना सोडून दिले. या सहकाऱ्यांनीच आपच्या नेतृत्वाला याची माहिती दिली.

चौहान यांनी जरवाल यांच्या अटकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. जरवाल हे दुपारी पोलीस ठाण्यात गेले होते. त्यांनी त्यांना सर्व माहिती दिली होती. रात्री उशिरा त्यांना अशा पद्धतीने अटक करण्याची का आवश्यकता होती, असा सवाल उपस्थित केला. आम्हीही मुख्य सचिवांविरोधात तक्रार दाखल केली आहे. पण त्यांना अटक केलेली नाही. आम्ही शरण येण्यास तयार होतो, ते वाट पाहू शकले असते, असेही त्यांनी म्हटले.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी मुख्य सचिव अंशू प्रकाश यांना धक्काबुक्की करण्यात आली होती. अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी एका बैठकीसाठी अंशू प्रकाश गेले होते. यावेळी आपच्या दोन आमदारांनी त्यांच्यावर हल्ला चढवल्याचा प्रकाश यांचा दावा आहे. प्रकाश भाजपाच्या तालावर नाचत असून भाजपाने विरोध करताना खूपच खालची पातळी गाठली असल्याचा आरोप आपने केला होता. दरम्यान, दिल्लीतील प्रशासकीय अधिकाऱ्यांना या मारहाणप्रकरणामुळे बंदचे हत्यार उगारले होते.