नवी दिल्ली : अरविंद केजरीवाल यांना झालेल्या अटकेविरोधात ‘आप’च्या नेत्यांनी दिल्ली, महाराष्ट्र, गुजरात, पंजाब, केरळ, पश्चिम बंगाल, जम्मू आणि काश्मीर. छत्तीसगड आणि देशात इतरत्र निदर्शने केली. केजरीवाल यांना झालेली ही अटक म्हणजे लोकशाहीवरील हल्ला असल्याचा आरोप ‘आप’कडून करण्यात आला.

 दिल्लीमध्ये ‘अरविंद तुम संघर्ष करो, हम तुम्हारे साथ है’ अशा घोषणा देत ‘आप’चे शेकडो कार्यकर्ते आणि नेते रस्त्यावर उतरले. अर्थमंत्री आतिशी, आरोग्यमंत्री सौरभ भारद्वाज आणि इतर कार्यकर्त्यांना निदर्शने करताना पोलिसांनी ताब्यात घेतले. ‘आप’ आणि भाजपच्या कार्यालयांजवळ असलेल्या आयटीओजवळ ही निदर्शने करण्यात आली. ‘‘आम्ही शांततापूर्ण निदर्शने करत असताना पोलिसांनी ताब्यात घेतले’’, असे आतिशी यांनी ‘एक्स’वर लिहिले.

हेही वाचा >>> केजरीवालच मुख्य सूत्रधार; मद्य धोरण गैरव्यवहारप्रकरणी ‘ईडी’चा न्यायालयात दावा; सहा दिवसांची कोठडी

पक्षाला केजरीवालांच्या सुरक्षेविषयी चिंता वाटत असल्याची आतिशी यांनी सांगितले. तर, ‘‘या प्रसंगी पक्ष केजरीवाल यांच्या पाठीशी असून यातून ते अधिक मोठे नेते होऊन बाहेर येतील’’, असा विश्वास पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी व्यक्त केला. मुंबईमध्येही ‘आप’च्या कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. आपल्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी मारहाण केली आणि महिलांना ताब्यात घेण्यात आले असा आरोप  पक्षाच्या राज्यप्रमुख प्रीती शर्मा मेनन यांनी केला. पश्चिम बंगालमध्ये ‘आप’ आणि भाजपच्या कार्यकर्त्यांदरम्यान संघर्ष झाला. जम्मू आणि काश्मीरमध्ये निदर्शने करणाऱ्या ‘आप’च्या कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली. केरळमध्ये इंडिया आघाडीचे घटक पक्ष असलेल्या माकप आणि काँग्रेसने निदर्शने केली.

केजरीवाल ‘ट्रेंडिंग’

‘आप’चे आमदार, नेते आणि कार्यकर्त्यांनी समाजमाध्यमांवरही आक्रमक भूमिका घेतली. ‘एक्स’वर ‘आयस्टँडविथकेजरीवाल’ आणि ‘इंडियाविथकेजरीवाल’ हा हॅशटॅग चालवण्यात आला. ‘देशकेजरीवालकेसाथहै’ आणि ‘अरविंदकेजरीवालअरेस्टेड’ हे हॅशटॅग दिवसातील बराच काळ पहिल्या पाच ट्रेंडिंगमध्ये होते. कोणत्याही हुकुमशहाचा तुरुंग लोकशाहीला दीर्घकाळ तुरुंगात टाकण्याइतका मजबूत नसतो असे भारद्वाज यांनी ‘एक्स’वर लिहिले.