दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे सध्या तिहार तुरुंगात न्यायालयीन कोठडी भोगत आहेत. यादरम्यान, आम आदमी पार्टीचे खासदार संजय सिंह यांनी दावा केला आहे की, केजरीवाल यांचा तुरुंगात छळ केला जात आहे. संजय सिंह यांनी काही वेळापूर्वी पत्रकार परिषद घेऊन केंद्र सरकारवर गंभीर आरोप केले. सिंह म्हणाले, मोदी सरकार अरविंद केजरीवालांचं मनोबल तोडण्यासाठी खालच्या थराला गेलं आहे. नियमांनुसार आणि जेल मॅन्युअलनुसार (तुरुंगाची नियमावली) तुरुंग प्रशासन तुरुंगातील कैद्यांना त्यांचे नातेवाईक आणि इतरांना समोरासमोर भेटू देतं. नातेवाईक आणि मित्रांना समोरासमोर भेटण्याचा कैद्यांना अधिकार आहे. मात्र केजरीवाल हे त्यांच्या पत्नीलादेखील भेटू शकत नाहीयेत. त्यांना खिडकीतून बोलावं लागतंय.

संजय सिंह म्हणाले, तुरुंग प्रसाशन मुख्यमंत्र्यांना त्यांच्या पत्नीलादेखील भेटू देत नाहीयेत. काचेच्या खिडकीतून ते एकमेकांना पाहू शकतात आणि थोडा वेळ बोलू शकतात. मी जबाबदारीने सांगतोय की, अनेक कुख्यात गुंड आणि मोठ्या गुन्हेगारांचे नातेवाईक आणि मित्र त्यांना बराकीत जाऊन भेटतात. परंतु, तीन वेळा निवडून आलेल्या मुख्यमंत्र्यांना त्यांची पत्नी बराकीत जाऊन भेटू शकत नाही. हा अत्याचार आहे.

संजय सिंह पत्रकार परिषदेत म्हणाले, तुरुंग प्रशासनाने टोकन नंबर ४१५२ जारी करून आम्हाला सांगितलं की, भगवंत मान आणि संजय सिंह हे टोकन दाखवून केजरीवाल यांना भेटू शकतात. परंतु, रात्री आम्हाला एक मेल आला की सुरक्षेच्या कारणास्तव भगवंत मान आणि संजय सिंह केजरीवालांना भेटू शकत नाहीत. सरकारच्या सांगण्यावरून तुरुंग प्रशासन भगवंत मान आणि अरविंद केजरीवाल यांचा अपमान करण्याचा प्रयत्न करत आहे.

दरम्यान, २१ मार्च रोजी केजरीवाल यांना अटक झाल्यापासून आतापर्यंत त्यांचं वजन ४.५ किलोने कमी झाल्याचा दावा आदमी पक्षाने केला आहे. तर, अरविंद केजरीवाल यांना अटक झाल्यानंतर त्यांचं वजन घटलेलं नाही, उलट १ किलोने वाढलं आहे, असा दावा दिल्लीतील भाजपाचे विरोधी पक्षनेते रामवीर सिंह बिधुरी यांनी केला आहे.