अफगाणिस्तानात आता तालिबानची सत्ता आहे. त्यामुळे तिथल्या नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. तालिबानच्या दहशतीनं तिथले नागरिक देश सोडून इतर देशात आश्रय घेत आहेत. दुसरीकडे अफगाणिस्तानमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना मायदेशी आणलं जात आहे. त्याचबरोबर अफगाणिस्तानात असलेल्या अल्पसंख्यांक नागरिकांनाही भारतात आणलं जात आहे. रविवारी वायुदलाचं सी-१७ विमान काबुलमधून गाझियाबादच्या हिंडन एअरबेसवर उतरलं. विमानात १६८ जण होते. त्यात १०७ भारतीय नागरिक आहेत. ज्या लोकांना सुखरुपरित्या भारतात आणलं गेलं, त्यात अफगाणिस्तानातील एक शीख खासदार आणि काही नेत्यांचा समावेश आहे. अफगाणिस्तानमधून भारतात आल्यानंतर शीख खासदार नरेंद्र सिंह खालसा यांना अश्रू अनावर झाले. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारचे आभार मानले.

“मला तिथली परिस्थिती पाहून रडायला येत आहे. ज्या अफगाणिस्तानात आम्ही अनेक पिढ्यांपासून राहत आहोत. तिथे अशी परिस्थिती आम्ही कधीच बघितली नव्हती. आता परिस्थिती खूपच गंभीर आहे. सर्वकाही संपलं आहे. २० वर्षात जे सरकार स्थापन झालं होतं. सर्व संपलं असून आता शून्य झालं आहे”, असं नरेंद्र सिंह खालसा यांनी सांगितलं. भारतीय वायुसेनेनं अफगाणिस्तानात अडकलेल्या इतर शीख बांधवांनाही वाचवावं. एका गुरुद्वारात जवळपास २८० शीख बांधव अडकले आहेत. ते मदतीची वाट बघत आहेत, असंही त्यांनी पुढे सांगितलं.

अफगाणिस्तानमध्ये तालिबानी सत्तेनंतर आता नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण आहे. तालिबानच्या राजवटीत नरकयातना भोगव्या लागतील, या भीतीने अनेक नागरिक देश सोडून पलायन करत आहेत. अशातच देश सोडून जाणाऱ्या नागरिकांची विमानतळावर गर्दी पाहायला मिळत आहे. त्यामुळे विमानतळावर गोंधळाचं वातावरण निर्माण झालं आहे. काबुल आंतरराष्ट्रीय विमानतळाबाहेर लोकांची गर्दी झाल्याने तणावपूर्ण स्थिती आहे. अशातच गोंधळ झाला आणि चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंगरीत ७ अफगाण नागरिकांचा मृत्यू झाला आहे. याबाबतची माहिती ब्रिटीश लष्कराने दिली आहे. “अफगाणिस्तानमधील स्थिती गंभीर आहे. परिस्थिती सुरक्षितरित्या हातळण्याचे प्रयत्न सुरु आहेत. यासाठी जे काही आवश्यक आहे ते केलं जात आहे”, असं ब्रिटीश लष्कराने आपल्या निवेदनात सांगितलं आहे.