मोबाइल फोनच्या नुकसानीवरुन बहिणीबरोबर जोरदार भांडण झाल्यानंतर गुलशन शेरावत या १७ वर्षीय युवकाने स्वत:वर गोळी झाडून घेतली. या दुर्देवी घटनेत गुलशनचा मृत्यू झाला आहे. दिल्लीच्या बिंदापूरमधील मातीआला भागात ही घटना घडली. छातीत गोळी लागल्याने गुलशन गंभीररित्या जखमी झाला होता. त्याला लगेचच जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. तिथे डॉक्टरांनी त्याला तपासल्यानंतर मृत घोषित केले.

पोलिसांना त्याच्या पॅन्टच्या खिशामध्ये चार जिवंत काडतूसे सापडली. पोलिसांनी ही पिस्तूल जप्त केली आहे. देशीबनावटीची ही पिस्तूल आहे. आकाश हॉस्पिटलकडून सकळी सहाच्या सुमारास पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. गोळी लागल्याने एक मुलगा गंभीररित्या जखमी झाला आहे असे पोलिसांना सांगण्यात आले. गुलशनला रुग्णालयात आणले त्यावेळी मोठया प्रमाणावर रक्तस्त्राव सुरु होता असे डॉक्टरांनी सांगितले.

गुलशनने अत्यंत जवळून ही गोळी झाडली. त्याच्या पॉकेटमध्ये पोलिसांना आणखी चार जिवंत काडतूस सापडली. आपल्या मुलानेच स्वत:ला इजा पोहोचवली असे गुलशनचे वडिल रणबीर शेरावत यांनी डॉक्टरांना सांगितले. गुलशनच्या हातून बहिणीचा मोबाइल फोन तुटला. त्यावरुन त्याचे आणि बहिणीचे जोरदार भांडण झाले होते. या वादावादीनंतर शनिवारी रात्री रागाच्या भरात तो घरातून निघून गेला. रविवारी सकाळी घरी परतल्यानंतर त्याने बंदुकीतून स्वत:वर गोळी झाडून घेतली असे रणबीर शेरावत यांनी पोलिसांना सांगितले.

जेव्हा मी दरवाजा उघडला तेव्हा गुलशन घरात रक्ताच्या थारोळयात पडलेला होता असे रणबीर यांनी सांगितले. गुलशन दिल्लीच्या अशोक विहारमधील सत्यवती कॉलेजमधील कौशल्य विकासाच्या पहिल्या वर्षाला होता.