पीटीआय, कांकेर

छत्तीसगडच्या नक्षलग्रस्त कांकेर जिल्ह्यात मंगळवारी झालेल्या चकमकीत २९ नक्षलवादी ठार झाले. या मोहिमेमुळे नक्षलवाद्यांच्या उत्तर बस्तर विभाग समितीला मोठा धक्का बसला आहे.  ही समिती बेकायदा निधी गोळा करणे आणि बेकायदा पुरवठा यंत्रणे चालवत होती, असा दावा पोलिसांनी केला आहे.  

अजून बरेच काही करायचे आहे आणि पोलीस योग्य दिशेने जात आहेत, असे पोलीस महानिरीक्षक (बस्तर रेंज) सुंदरराज पी यांनी पीटीआयला सांगितले. गेल्या तीन दशकांपासून नक्षलवादाचा सामना करत असलेल्या राज्यातील आतापर्यंतच्या सर्वात मोठय़ा चकमकीत सुरक्षा दलाच्या जवानांनी मंगळवारी कांकेरमध्ये २९ नक्षलवाद्यांना ठार केले. घटनास्थळावरून एके-४७, एसएलआर, इनसास आणि पॉइंट ३०३ रायफल्ससह शस्त्रांचा मोठा साठा जप्त करण्यात आला आहे, असे पोलिसांनी सांगितले.

छत्तीसगडमध्ये १९ एप्रिल रोजी होणाऱ्या पहिल्या टप्प्यातील मतदानापूर्वी ही कारवाई करण्यात आली.ठार झालेल्यांमध्ये शंकर राव आणि ललिता या नक्षलवाद्यांचा समावेश आहे, त्यांच्या डोक्यावर प्रत्येकी ८ लाख रुपयांचे बक्षीस होते, असे पोलिसांनी सांगितले.ही चकमक कांकेर, नारायणपूर (छत्तीसगडमधील) आणि गडचिरोली (महाराष्ट्रालगत) येथे झाली. हा नक्षलग्रस्त भाग उत्तर बस्तर विभाग समितीसाठी सुरक्षित आश्रयस्थान मानला जात होता, सुंदरराज पी. यांनी सांगितले.

हेही वाचा >>>इस्रायलवर केलेला हल्ला इराणला भोवणार, अमेरिकेने उचललं ‘हे’ मोठं पाऊल

‘मंगळवारच्या चकमकीमुळे उत्तर बस्तर विभाग समितीला मोठा धक्का बसला आहे. तथापि, ते पूर्णपणे संपवण्यासाठी अजून बरेच काही करणे बाकी आहे आणि आम्ही योग्य दिशेने जात आहोत,’ ते म्हणाला. ठार झालेल्या नक्षलवाद्यांची ओळख पटवण्याची प्रक्रिया सुरू असून आतापर्यंत शंकर राव आणि ललिता यांची ओळख पटली आहे. मारल्या गेलेल्या नक्षलवाद्यांमध्ये १५ महिलांचा समावेश असल्याचे त्यांनी सांगितले. प्रथमदर्शनी असे दिसते की बहुतेक ठार झालेले नक्षलवादी हे परतापूर क्षेत्र समितीचे होते.

चकमकीच्या ठिकाणी शांतता

कांकेर जिल्ह्यातील हिदूर आणि कालपर गावांना लागून असलेल्या टेकडय़ांवर चकमकीनंतर शांतता पसरली आहे. राज्यातील आतापर्यंतची सर्वात मोठी चकमक संपल्यानंतर काही तासांनंतर बुधवारी घटनास्थळावरील झाडांवर गोळय़ांच्या खुणा दिसू लागल्या. आजूबाजूच्या गावांमध्ये, स्थानिक आदिवासी, त्यापैकी बहुतेक महिला त्यांच्या कामात व्यग्र होत्या. मात्र स्थानिकांनी चकमकीविषयी काहीही बोलण्यास नकार दिला. चकमकीच्या ठिकाणी जाण्याचा मार्ग, बहुतांशी मातीचे रस्ते किंवा जंगलाचे मार्ग, अनेक ठिकाणी खोदण्यात आले होते. स्थानिकांना लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन करणारी नक्षलवादी पोस्टर्स आणि मारल्या गेलेल्या नक्षलवाद्यांचे माओवाद्यांचे स्मारक जवळपास दिसून येत होते.