नवी दिल्ली : केंद्रात भाजपप्रणित मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून देशात द्वेष वाढू लागला आहे. वाढती महागाई आणि बेरोजगारीमुळे लोकांना भवितव्याची चिंता आणि भीती वाटू लागली आहे. त्यातून द्वेष वाढतो, समाजात दुही वाढते. त्यास भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ खतपाणी घालत आहे, अशी टीका काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी रविवारी केली.

रामलीला मैदानावर काँग्रेसच्या ‘महागाईविरोधातील हल्लाबोल’ सभेत राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केल़े ‘‘काँग्रेससह विरोधी पक्षांसाठी मोदी सरकारने चर्चा करण्याचे, विचार मांडण्याचे सर्व रस्ते बंद करून टाकले आहेत. आम्हाला महागाई-बेरोजगारी, चीनची घुसखोरी अशा अनेक संवेदनशील मुद्दय़ांवर चर्चा करू दिली नाही. संसदेमध्ये विरोधकांना बोलू दिले जात नाही. त्यांचे माइक बंद केले जातात. पंतप्रधान मोदी देशाला मागे घेऊन जात आहेत, देशात द्वेष पसरवत आहेत. त्याचा फायदा चीन, पाकिस्तानसारखे देश घेऊ लागले आहेत. गेल्या आठ वर्षांमध्ये मोदींनी देशाला कमकुवत केले आहे’’, अशी घणाघाती टीकाही त्यांनी केली.

Raj Thackeray
ट्रिपल इंजिन सरकारला मनसेच्या चौथ्या इंजिनाची गरज का भासली? राज ठाकरे म्हणाले, “त्यांना माझ्याकडून…”
rahul gandhi clarifies his stance on the controversy over the congress manifesto
जातगणनेच्या नावाने ‘देशभक्त’ भयग्रस्त; राहुल गांधी यांची टीका, संपत्तीच्या फेरवाटपाच्या आरोपांनाही उत्तर
Election Commission guidelines about Rahul Gandhi Abhishek Banerjee choppers searches
“राहुल गांधींचं हेलिकॉप्टर तपासता, मग मोदींचं का नाही?”, काय आहेत नियम…
Shobha Bachhav, Congress workers sloganeering,
डॉ. शोभा बच्छाव यांच्या विरोधात काँग्रेस कार्यकर्त्यांची घोषणाबाजी

..तर मोदी पंतप्रधान झाले असते?

‘मोदी देशाचे पंतप्रधान असले तरी, देशात फक्त दोन बडय़ा उद्योजकांचे राज्य असून ते मोदींना पाठिंबा देतात आणि मोदीही त्यांचे भले करतात. दोन उद्योजकांचा पाठिंबा नसता तर मोदी पंतप्रधान बनू शकले नसते. मोदींनी नोटबंदी करून गरिबांचा नव्हे तर, उद्योजकांचा लाभ करून दिला. शेतकऱ्यांसाठी मात्र काळे कृषी कायदे आणले. त्यातूनही उद्योजकांचाच फायदा करून देण्याचा मोदी सरकारचा हेतू होता’’, असे राहुल गांधी म्हणाल़े

बेरोजगारी आणखी वाढेल!

इच्छा असली तरी, लोकांना रोजगार मिळू शकत नाही. देशात दोन बडे उद्योजक रोजगार देत नाहीत तर, हजारो छोटे उद्योग रोजगार निर्माण करत असतात़  पण, त्यांची वाताहात झाली आहे. देशातील बेरोजगारी आणखी वाढेल. त्यातून लोकांमध्ये द्वेषभावनाही वाढेल, असा इशारा राहुल यांनी दिला. यूपीए आणि मोदी सरकारच्या काळातील महागाईवर भाष्य करताना राहुल यांनी विविध वस्तूंच्या भाववाढीची तौलनिक आकडेवारीही दिली. देशाने इतकी प्रचंड महागाई कधीही पाहिली नव्हती. ७० वर्षांत काँग्रेसने इतक्या महागाईचे ओझे देशवासीयांच्या खांद्यावर लादले नव्हते, असे ते म्हणाले.

देश दोन उद्योजकांच्या ताब्यात

राहुल गांधी यांनी देशातील दोन प्रमुख उद्योजकांवर नाव न घेता टीका केली. ‘भारतात दोन देश असून एका देशात गरिबांना स्वप्नेदेखील पाहता येत नाहीत, कितीही घाम गाळला तरी त्यांना काही मिळत नाही. पण, दुसरा देश १०-१२ उद्योजकांचा, अब्जाधीशांचा आहे. त्यांची सगळी स्वप्ने पूर्ण होतात. दोन बडय़ा उद्योजकांच्या हातात विमानतळ, बंदर, सेलफोन, तेल असे अनेक महत्त्वाचे उद्योग एकवटलेले आहेत’, असे राहुल म्हणाले. ‘दोन उद्योजकांनी माध्यम कंपन्याही ताब्यात घेतल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या प्रतिनिधींना लोकांचे प्रश्न मांडता येत नाहीत. लोकांपर्यंत वस्तुस्थिती पोहोचवली जात नाही. हे उद्योजक आणि माध्यमे २४ तास मोदींसाठी काम करतात आणि मोदी त्यांच्यासाठी काम करतात. उद्योजकांनी माध्यमांवर आणि त्याद्वारे मोदी सरकारवरही नियंत्रण मिळवले आहे’’, अशी टीकाही राहुल यांनी केली.

गुलामनबी आझाद यांच्या राजीनाम्यानंतर, पहिल्यांदाच जाहीरसभा घेणाऱ्या राहुल गांधी यांनी काँग्रेसमधील अंतर्गत वादावर भाष्य केले नाही. पण, देशाला फक्त काँग्रेसचा कार्यकर्त्यां वाचवू शकतो, असे राहुल म्हणाले.

अशोक चव्हाण पहिल्या रांगेत

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर, चर्चेचे केंद्र राहिलेले अशोक चव्हाण रामलीला मैदानावर तमाम प्रमुख काँग्रेस नेत्यांसह उपस्थित होते. चव्हाण यांना व्यासपीठावर पहिल्या रांगेत स्थान देण्यात आले होते. २०१४ मध्ये महागाईचा मुद्दा घेऊन भाजपने केंद्रातील काँग्रेस सरकारविरोधात प्रचार केला होता, लोकांनीही त्यांना पाठिंबा दिला होता. पण, आता लोक भाजपला महागाईबद्दल जाब विचारत आहेत. सामान्य लोकांना न्याय देण्यासाठी काँग्रेसने आंदोलन हाती घेतले असून झोपलेल्या केंद्र सरकारला जागे केले जाईल, असे चव्हाण म्हणाले.

राहुल गांधींसाठी फलकबाजी

काँग्रेसमध्ये पक्षाध्यक्षपदासाठी निवडणूक होणार असली तरी, राहुल गांधी यांनीच हे पद सांभाळावे, यासाठी रामलीला मैदानावर फलकबाजी करण्यात आली. लोकसभेतील काँग्रेसचे गटनेते अधीर रंजन चौधरी यांनी फलकबाजीचा विशेष उल्लेख केला. काँग्रेसमधील वरिष्ठ नेतेही राहुल यांना पक्षाध्यक्ष होण्याची विनंती करत आहेत.

मोदींचे बोलणे संसदेबाहेरच!

काँग्रेसने आंदोलन केले म्हणून अखेर केंद्र सरकार संसदेत महागाईवर चर्चेसाठी तयार झाली. पण, चर्चेसाठी वेळ दिला फक्त ५ तास, त्यातही काँग्रेसला बोलण्यासाठी फक्त २८ मिनिटे देण्यात आली. मोदी संसदेबाहेर प्रचंड बोलतात पण, संसदेत कधीही उत्तर देत नाहीत, प्रसारमाध्यमांसमोर मौन बाळगतात, अशी टीका मल्लिकार्जुन खरगे यांनी केली. ‘यूपीए-२’च्या काळातील अण्णा हजारेंचे आंदोलन म्हणजे काँग्रेसविरोधातील कट होता. त्यावेळी वेगवेगळय़ा कथित घोटाळय़ांची नावे घेऊन काँग्रेस सरकारची बदनामी केली गेली, असे अशोक गेहलोत म्हणाले.

भारत जोडोयात्रेचाच पर्याय

काँग्रेसने ७ सप्टेंबरपासून ‘भारत जोडो’ यात्रेचे आयोजन केले आहे. ‘‘मोदी सरकारने देशातील सर्व संस्था ताब्यात घेतल्या आहेत. माध्यमांवरही नियंत्रण मिळवले आहे. त्यामुळे विरोधी पक्षांना लोकांपर्यंत पोहोचून वस्तुस्थिती सांगण्याशिवाय पर्याय उरलेला नाही’’ असे या यात्रेमागील प्रमुख कारण विशद करताना राहुल गांधी म्हणाल़े  ‘भारत जोडो’ यात्रेमध्ये राजकीय पक्ष, सामाजिक संस्था आदी सर्वानी सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले.

राहुल गांधीच घाबरलेले – भाजपचा टोला

पाच हजार कोटींच्या नॅशनल हेराल्ड प्रकरणात राहुल गांधी आणि सोनिया गांधी हे जामिनावर आहेत. त्यामुळे राहुल गांधी यांच्या वक्तव्यात भीती आणि द्वेष होता, असा टोला भाजप प्रवक्ते सांबित पात्रा यांनी लगावला. राहुल गांधी यांना राजकारणात उभारी देण्यासाठीच या सभेचा खटाटोप काँग्रेसने केला, असा आरोप भाजप प्रवक्ते राजवर्धन सिंह राठोड यांनी पत्रकार परिषदेत केला.