अकबर हा महान राजा नव्हताच. ते तर बाहेरून आलेले राजा होते, असे विधान राजस्थानचे शिक्षण मंत्री वासुदेव देवनानी यांनी केले आहे. शालेय विद्यार्थ्यांना शिकवला जाणारा पाठ्यपुस्तकी इतिहास बदलून टाकण्याचा या शिक्षण मंत्र्यांचा मानस आहे. देशभरातील शाळांमध्ये शिकवल्या जाणाऱया इतिहासात विद्यार्थ्यांना परदेशातून आलेल्या राजांचीच माहिती दिली जाते. याऐवजी आपण महाराणा प्रताप, आर्यभट्ट यांच्यासारख्या भारतीय थोर पुरूषांची माहिती द्यायला हवी, असे देवनानी यांना वाटते. इतकेच नव्हे तर, मंत्री झाल्यानंतर देवनानी यांनी सर्वप्रथम राज्यातील सर्व सरकारी शाळांमध्ये विद्यार्थ्यांना रोज सुर्यनमस्काराच्या सक्तीची घोषणा केली होती.
अकबर हे महान राजे नव्हते, ते तर परप्रांतातून आलेले होते. अशा परदेशातून आलेल्यांमुळेच देशात स्वातंत्र्य चळवळ झाली असे स्पष्टीकरण देवनानी यांनी ‘द इंडियन एक्स्प्रेस’ला दिलेल्या मुलाखतीत दिले. अकबर पेक्षा महाराणा प्रताप थोर होते. आपल्या पाठ्यपुस्तकांमध्ये अकबर, न्यूटन यासारख्या व्यक्तींवर एक धडा आहे. पण महाराणा प्रताप किंवा आर्यभट्ट यांच्यावर आधारित एकही धडा नसल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला. परदेशातील थोर राजे व संशोधकांसोबतच भारतातील थोर राजे, संशोधक, वैज्ञानिक यांचीही माहिती विद्यार्थ्यांना द्यायला हवी असेही ते म्हणाले.