अल कायदा या दहशतवादी संघटनेच्या भारतीय उपखंडातील शाखेकडून एक ध्वनीचित्रफीत जारी करण्यात आली असून त्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य करण्यात आले आहे. या व्हिडिओत नरेंद्र मोदींनी मुस्लीम समाजाविरोधी केलेल्या वक्तव्यांचा दाखला देण्यात आला आहे. ‘फ्रॉम फ्रान्स टू बांग्लादेश: दि डस्ट विल नेव्हर सेटल डाऊन’ नावाच्या या व्हिडिओत अल कायदाच्या भारतीय उपखंडातील कारवायांचा प्रमुख असिम उमर याने अनेक घटनांविषयी भाष्य केले आहे. जागतिक बॅक, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी यांसारख्या संघटनांची धोरणे, ड्रोन हल्ले, शार्ली हेब्दोतील लिखाण, संयुक्त राष्ट्संघ आणि नरेंद्र मोदी यांच्या मुस्लिमांविरोधातील कडव्या विधानांच्या माध्यमांतून मुस्लिमांना संपविण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोपही या व्हिडिओद्वारे करण्यात आला आहे. याशिवाय, फेब्रुवारीमध्ये अविजित रॉय याच्यासह अन्य चार ब्लॉगर्सच्या झालेल्या हत्यांची जबाबादारीही अल कायदाने या व्हिडिओच्या माध्यमातून स्विकारली आहे.
अशाप्रकारे थेट पंतप्रधान मोदींचा उल्लेख या व्हिडिओत असल्याने खळबळ उडाली आहे. भारतीय सुरक्षा यंत्रणांनी या घटनेची गंभीर दखल घेत सावधगिरीची पावले उचलायला सुरुवात केली आहे.