फेसबुक पोस्टद्वारे देशविरोधी आणि सरकारविरोधी टिप्पणी करणे एका सरकारी शाळेतील शिक्षकाला भोवले आहे. उत्तर प्रदेश राज्य शिक्षण विभागाने शिक्षकाला निलंबित केले आहे. धर्मेंद्र कुमार (वय ३५) असे शिक्षकाचे नाव असून, त्याने पाकिस्तान क्रिकेट संघाचे अभिनंदन केले आहे. तसेच वस्तू व सेवा कर लागू न करणारे जम्मू आणि काश्मीर राज्य आपल्या देशाचा अविभाज्य भाग नसल्याचे फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे. त्याने दुसऱ्या एका पोस्टमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याविरोधातही टिप्पणी केली आहे.

धर्मेंद्र कुमार अलिगढमधील अलिपूर परिसरातील एका सरकारी प्राथमिक शाळेत कार्यरत आहे. त्याने फेसबुक पोस्टमध्ये सरकारविरोधी आणि देशविरोधी टिप्पणी केल्याचा आरोप आहे. एका पोस्टमध्ये त्याने विजयी पाकिस्तानी क्रिकेट संघाचे अभिनंदन केले आहे. तसेच दुसऱ्या एका पोस्टमध्ये जीएसटी लागू न करणारे जम्मू-काश्मीर हे राज्य देशाचा अविभाज्य भाग नाही, असे म्हटले आहे. धर्मेंद्र कुमारविरोधात शिक्षण विभागाकडे आलेल्या तक्रारीत या फेसबुक पोस्टचे स्क्रीन शॉट्सही जोडले आहेत, अशी माहिती या प्रकरणाची चौकशी करणारे शिक्षण अधिकारी धीरेंद्र सिंह यादव यांनी इंडियन एक्स्प्रेसला दिली.

धर्मेंद्र कुमार याने फेसबुकवर आणखी एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याविरोधातही आक्षेपार्ह टिप्पणी केली आहे. या प्रकरणात धर्मेंद्र दोषी आढळला असून त्याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. देशविरोधी आणि सरकारविरोधी टिप्पणी केल्याचा त्याच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी पोलिसांची मदत घेण्यात येत आहे. चौकशी अहवालाच्या आधारे त्याच्याविरोधात एफआयआर दाखल करायचा की नाही, याचा निर्णय घेण्यात येणार आहे, असेही यादव यांनी सांगितले.

बिजौलीच्या ब्लॉक अधिकाऱ्याकडे हे प्रकरण सोपवले आहे. लवकरात लवकर अहवाल सादर करण्यात यावा, असे आदेश त्यांना दिले आहेत. धर्मेंद्र कुमारचा जबाब नोंदवण्यात येणार आहे. या प्रकरणी शिक्षक धर्मेंद्र कुमार याने स्पष्टीकरण दिले आहे. मी एक क्रिकेटर आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये भारताविरुद्ध विजय मिळवल्यानंतर पाकिस्तान संघाचे अभिनंदन केले होते. मी स्वतः क्रिकेटर असल्याने त्यांचे अभिनंदन केले. पण देशविरोधी कोणतीही टिप्पणी केली नाही. तसेच जम्मू-काश्मीरसंदर्भातील पोस्टचे म्हणाल तर तेथील लोकांकडून जीएसटी का वसूल केला जात नाही, असा प्रश्न मी उपस्थित केला, असे त्याने इंडियन एक्स्प्रेसला सांगितले.