नवी दिल्ली : अमेठीतील भाजपच्या उमेदवार व केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी वारंवार दिलेले आव्हान स्वीकारून काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी या पारंपरिक मतदारसंघात परतणार की, मेहुणा रॉबर्ट वढेरा  यांना संधी देणार याबाबत संदिग्धता कायम राहिली आहे.

अमेठीमध्ये २० मे रोजी मतदान होणार असून अखेरच्या क्षणी राहुल गांधी अमेठीतून उमेदवारी अर्ज दाखल करू शकतील असे काँग्रेसच्या नेत्यांचे म्हणणे आहे. मात्र, समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांच्या उपस्थितीत बुधवारी झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेमध्ये राहुल गांधींनी अमेठीतील उमेदवारीचा प्रश्न गुलदस्त्यात ठेवला. ‘मी काँग्रेसचा निष्ठावान कार्यकर्ता असून उमेदवारीसंदर्भातील निर्णय पक्षाच्या केंद्रीय निवड समितीमध्ये घेतले जातात. समितीचा निर्णय मला मान्य असेल’, असे राहुल गांधी यांनी सांगितले.

हेही वाचा >>>इस्रायलवर केलेला हल्ला इराणला भोवणार, अमेरिकेने उचललं ‘हे’ मोठं पाऊल

उत्तर प्रदेशमधील ८० जागांपैकी ६३ जागा ‘सप’ तर, काँग्रेस १७ जागा लढवत आहेत. अमेठी व रायबरेली या दोन्ही जागा काँग्रेसला देण्यात आल्या आहेत. अमेठीमधून लोकसभेची निवडणूक लढवण्याची इच्छा प्रियंका गांधी यांचे पती रॉबर्ट वढेरा  यांनी व्यक्त केली आहे. गांधी कुटुंबातील सदस्याने अमेठीतून निवडणूक लढवावी असे स्थानिकांचे म्हणणे असल्याचे मत वढेरा यांनी व्यक्त केले होते. मात्र अमेठीतून राहुल गांधी यांनी लढावे असे उत्तर प्रदेशातील काँग्रेस नेत्यांचे म्हणणे आहे.

‘भाजपची मजल दीडशे जागांपर्यंतच’

लोकसभा निवडणुकीत भाजपची मजल दीडशे जागांपर्यंत जाईल असा दावा काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला आहे. समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्यासह घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत त्यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले. जागांचे भाकीत मी वर्तवत नाही. साधारण पंधरा दिवसांपूर्वी भाजप १८० जागा जिंकेल असा माझा अंदाज होता. मात्र आता त्यांना दीडशेच जागा मिळतील अशी स्थिती आहे असे राहुल यांनी नमूद केले. प्रत्येक राज्यात काँग्रेसची कामगिरी सुधारत असल्याचे अहवाल असल्याचे त्यांनी सांगितले. उत्तर प्रदेशात आमची भक्कम आघाडी आहे.