सौरऊर्जा प्रकरणी जागतिक व्यापार संघटनेच्या न्याय मंडळाने भारताविरोधात आणि अमेरिकेच्या बाजूने निर्णय दिला आहे. भारताने सौर ऊर्जा कार्यक्रम राबविताना आंतरराष्ट्रीय नियमांचे उल्लंघन केले, असा आरोप करताना अमेरिकेने जागतिक व्यापार संघटनेच्या लवादाकडे तक्रार दाखल केली होती.
जागतिक व्यापार संघटनेच्या निर्णयामुळे भारताचे सौर ऊर्जा धोरण संकटात सापडले असून आता भारत जिनेव्हाच्या जागतिक व्यापार संघटनेकडे दाद मागणार आहे, अशी माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली आहे. गतवर्षी अमेरिकेने जागतिक व्यापार संघटनेच्या सौर ऊर्जा कार्यक्रमात भारताचा समावेश केला होता. भारताने अमेरिकेच्या सौर ऊर्जा उपकरणांऐवजी स्थानिक उपकरणे वापरण्यास प्राधान्य दिले. त्यामुळे भारताने आंतरराष्ट्रीय नियमांचे उल्लंघन केले असा आरोप अमेरिकेने केला आहे. भारताने स्थानिक सौर उपकरणांसाठी निधी दिल्यामुळे अमेरिकेचे नुकसान झाले होते. भारताच्या या कृतीमुळे अमेरिकेच्या निर्यातीवर परिणाम झाला होता.