प्रक्षोभक भाषणप्रकरणी मंगळवारी अटक करण्यात आलेल्या मजलिस-ए-इत्तेहादूल मुस्लिमीनचे (एमआयएम) आमदार अकबरुद्दीन ओवैसी यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आल्यानंतर त्यांच्या अधिक चौकशीसाठी आंध्र प्रदेश पोलिसांनी सात दिवसांच्या कोठडीची मागणी केली आहे.
ओवेसी यांच्या प्रक्षोभक भाषण प्रकरणाची चौकशी पोलिसांतर्फे सुरू आहे. याच पोलीस ठाण्याने बुधवारी दंडाधिकारी न्यायालयात अकबरुद्दीन यांची अधिक चौकशी करण्यासाठी त्यांना सात दिवसांची पोलीस कोठडी देण्यात यावी, अशी मागणी केल्याचे करीमनगर विभागाचे पोलीस उपमहानिरीक्षक आर. भीमनायक यांनी या वृत्तसंस्थेला सांगितले.
निर्मल शहर पोलिसांनी ३ जानेवारी रोजी अकबरुद्दीन ओवैसी यांनी केलेल्या प्रक्षोभक भाषण प्रकरणी  गुन्हा दाखल केला होता. निर्मल शहर पोलीस ठाण्यात मंगळवारी रात्री अटकेनंतर चौकशी अधिकाऱ्यांनी अकबरुद्दीन ओवैसी यांची पुन्हा कसून चौकशी केली. त्या वेळी त्यांनी दिलेल्या जबाबाच्या आधारे पोलिसांनी बुधवारी त्यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम १२०-ब (गुन्हेगारी स्वरूपाचा कट रचणे), २९५ ए (जाणीवपूर्वक धार्मिक भावनांचा अनादर करून वर्गात तेढ निर्माण करणे) १२४ अ (राजद्रोह), १८८ (सरकारी अधिकाऱ्याने दिलेल्या आदेशाचा भंग) आणि कलम ५०५ अंतर्गत गुन्हे दाखल केले. त्यांच्या पोलीस कोठडीची मागणी करताना या कलमांचा अंतर्भाव पोलिसांनी न्यायालयाला सादर केलेल्या अर्जात केला आहे.
ओवैसी यांच्या अटकेनंतर बुधवारी अदिलाबाद जिल्ह्य़ात अनेक ठिकाणी सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली.
दरम्यान निर्मल पोलिसांनी पक्षाचे नेते आमदार अकबरुद्दीन ओवेसी यांच्या केलेल्या अटकेच्या निषेधार्थ अदिलाबाद आणि निझामाबाद जिल्हा शाखेने बुधवारी ‘बंद’चे आवाहान केले. त्यामुळे विविध भागांतील तसेच जुन्या हैदराबाद शहरातील दुकाने व व्यापारी संकुले पूर्णत: बंद होती. बुधवारी ‘एमआयएम’चे नेते व पाठिराख्यांनी ओवेसी यांच्या अटकेच्या निषेधार्थ अनेक ठिकाणी मोर्चे काढून त्याविरोधात घोषणाही दिल्या. मात्र सायंकाळपर्यंत बंददरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही.