जगातील एकूण वीस देशांच्या प्रमुखांनी करोना विरोधात तयारीसाठी जागतिक साथ उपाययोजना करार करण्याचे आवाहन केले आहे. असा करार झाला तरच आगामी पिढ्यांचे संरक्षण होईल असा दावा या देशांनी केला असला तरी करोना विरोधात  लढण्यासाठी विविध देशांना सहकार्य करण्यास भाग पाडण्याच्या नेमक्या कृती कोणत्या व त्या कशा अमलात आणल्या जाणार याची रूपरेषा स्पष्ट करण्यात आलेली नाही.

जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेड्रोस अधनोम घेब्रेसस, ब्रिटनचे बोरिस जॉन्सन, इटलीचे मारियो ड्रागी, रवांडाचे पॉल कॅगमे यांनी करोनाला रोखण्यासाठी सहकार्याचे आवाहन केले असून सज्जता व प्रतिसाद प्रणाली जास्त सजग करण्यात याव्यात असे म्हटले आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या चौकटीत काम करणाऱ्या संस्थांच्या मदतीने हे सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. देशांचे नेते म्हणून व आंतररराष्ट्रीय संस्था म्हणून कोविड साथीच्या निमित्ताने काही धडे शिकणे महत्त्वाचे आहे. सर्व देशांची एक जूट व सामाजिक दृढता त्यात महत्त्वाची आहे. कुठलाही देश लगेचच या साथीला प्रतिसाद देण्याची पद्धत बदलेल अशातला भाग नाही, पण कालांतराने सहकार्य होऊ शकते.  गेल्या आठवड्यात टेड्रॉस घेब्रेसस यांनी असे म्हटले होते,की श्रीमंत देशांनी किमान १ कोटी कोविड लशी इतर देशात यावर्षातील पहिल्या शंभर दिवसात लसीकरण करण्यासाठी देणगी म्हणून द्याव्यात, पण अजून एकाही देशाने लशी देणगी म्हणून देण्याचा प्रस्ताव मांडलेला नाही. जगात आतापर्यंत ४५ कोटी ९० लाख लोकांना लस देऊन झाली आहे, त्यात फक्त दहा देशातील लोकांचा प्रामुख्याने समावेश आहे. इतर २८ टक्के लोक हे केवळ एका देशातील आहेत.