लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांच्याकडून स्पष्ट

पाकिस्तानलगतच्या नियंत्रण रेषेवरील शस्त्रसंधीचे आयुर्मान शेजारी देशाच्या कृतींवर अवलंबून राहील, असे लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांनी गुरुवारी सांगितले. याचवेळी, सीमेवरील दहशतवादाचे जाळे अद्याप कायम असल्यामुळे आपल्या तयारीत कुठलेही शैथिल्य येणार नाही, यावर त्यांनी भर दिला.

‘नियंत्रण रेषेवरील शस्त्रसंधी सध्या लागू आहे. ती कायम राहील याची जबाबदारी संपूर्णत: पाकिस्तानवर आहे. ते शस्त्रसंधीचे पालन करतील, तोवर ती पाळण्याची आमची इच्छा आहे’, असे काश्मीरच्या दोन दिवसांच्या भेटीअखेरीस लष्करप्रमुखांनी निवडक पत्रकारांना सांगितले.

नियंत्रण रेषेच्या पलीकडील भागात दहशतवादी शिबिरे आणि दहशतवाद्यांचा वावर यांसह इतर दहशतवादी  कारवाया पाकव्याप्त काश्मीरमध्ये सुरू आहेत. त्यामुळे आमच्या तयारीमध्ये कुठलीही शिथिलता येऊ शकत नाही, असे जनरल नरवणे म्हणाले.

शस्त्रसंधीला आता १०० दिवस झाले असल्यामुळे पाकिस्तानवर भरवसा ठेवला जाऊ शकतो काय, असे विचारले असता लष्करप्रमुख म्हणाले, ‘भारत व पाकिस्तान यांच्यात अनेक दशकांपासून अविश्वाास आहे. त्यामुळे त्या आघाडीवरील परिस्थिती एका रात्रीत बदलू शकत नाही’.

पाकिस्तानने शस्त्रसंधीचे खऱ्या अर्थाने पालन केले, तर लहान-लहान पावलांमुळेही वाढीव फायदे होऊ शकतात, असेही मत नरवणे यांनी व्यक्त केले.