स्वदेशी बनावटीची ‘आयएनएस कामोर्टा’ ही पहिलीच पाणबुडीभेदी युद्धनौका शनिवारी संरक्षणमंत्री अरुण जेटली यांच्या हस्ते भारतीय नौदलाच्या सेवेत दाखल करण्यात आली़  संरक्षणाची सिद्धता हीच शांततेची सर्वोत्तम हमी असल्याचे उद्गार याप्रसंगी जेटली यांनी काढल़े  संरक्षण सामग्रीचा सर्वात मोठा ग्राहक अशी ओळख बदलून देश या सामग्रीचा मोठा उत्पादक झाला पाहिजे, असे मतही त्यांनी व्यक्त केल़े
भौगोलिकदृष्टय़ा भारत अत्यंत महत्त्वाच्या ठिकाणी आह़े  आपल्याला विस्तीर्ण समुद्रकिनारा लाभला आह़े  परंतु, त्याचबरोबर आपल्याला शेजार कलहाचाही इतिहास आह़े  अशा परिस्थितीत स्वसंरक्षणाची पूर्ण सिद्धता हीच प्रादेशिक सुरक्षिततेची हमी असेल, असेही जेटली पुढे म्हणाल़े  नौका बांधणीतील भारताच्या प्रगतीबाबत त्यांनी या वेळी समाधान व्यक्त केल़े
आयएनएस कामोर्टा ही युद्धनौका ९० टक्के  स्वदेशी बनावटीची असून कोलकतास्थित ‘गार्डन रीच शिपबिल्डर्स अ‍ॅण्ड इंजिनियन्स’ने याची बांधणी केली आह़े  ही बिनीची युद्धनौका असून पाणीबुडीविरोधी युद्ध खेळण्याची या नौकेची क्षमता आह़े  तसेच नौकेवर वायू आणि जमिनीवर डागण्यास सक्षम शस्त्रास्त्रे उपलब्ध आहेत. कमी पल्ल्याची जमिनीवरून हवेत मारा करण्याच्या क्षमतेची क्षेपणास्त्रे नौकेवर आहेत़  तसेच पाणबुडीविरुद्धच्या युद्धात उपयोगी पडणारे हेलिकॉप्टरही नौकेवर तैनात असणार आहे, अशी माहिती संरक्षण विभागाकडून देण्यात आली़
जगातील पाचव्या क्रमांकाचे नौदल असणाऱ्या भारतीय नौदलाच्या पाणबुडीच्या युद्धातील क्षमतेला या नौकेमुळे नवा आयाम मिळाल्याची प्रतिक्रिया अ‍ॅडमिरल आऱ क़े धवन यांनी व्यक्त  केली़
कामोर्टा
*नौकेची लांबी ११० मीटर
*रुंदी १४ मीटर
*वजन ३५०० टन
*वेग २५ सागरी मैल
*पाणबुडीभेदी अग्निबाण
*स्वदेशी बनावटीचे ‘रेवती’ रडार