मोदी सरकारने ५०० आणि १००० रूपयांच्या नोटा चलनातून रद्द करण्याच्या निर्णयावर मी कधीच टीका केली नसल्याचे माजी केंद्रीय मंत्री अरूण शौरी यांनी स्पष्ट केले. माझ्या नावाने खपविण्यात येणारी सर्व विधाने धादांत खोटी आहेत. मी यासंदर्भात ट्विटरला नोटीसही पाठविणार असल्याचे त्यांनी सांगितले. गेल्या काही दिवसांपासून सरकारचा नोटबंदीचा निर्णय आणि पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका करणारी काही विधाने माझ्या नावाने पसरवली जात आहेत. मी वारंवार या गोष्टी नाकारल्या आहेत, तसेच ट्विटर आणि फेसबुकवर माझे अकाऊंट नसल्याचेही जाहीरपणे सांगितले आहे. मात्र, तरीही हे उद्योग सुरू आहेत. माझ्या नावाने चुकीची विधाने पसरवल्याबद्दल मी सध्या ट्विटरला कायदेशीर नोटीस पाठविण्याचा विचार करत आहे, असे शौरी यांनी पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.

गेल्या काही दिवसांपासून समाज माध्यमांवर शौरी यांच्याकडून मोदींच्या निर्णयावर टीका करण्यात आल्याच्या बातम्या फिरत आहेत. या पार्श्वभूमीवर शौरी यांनी आज आपली भूमिका स्पष्ट केली. सोशल मिडीयावरील या बनावट अकाऊंटमुळे मला मनस्ताप सहन करावा लागत आहे, असे शौरी यांनी सांगितले.
दरम्यान, शौरी यांना सरकारच्या नोटबंदीच्या निर्णयाबद्द विचारण्यात आले असता काहीही बोलण्यास त्यांनी नकार दिला. मी सध्या या सगळ्यापासून कोसो दूर असलेल्या गोष्टीवर काम करत आहे. त्यामुळे मला सध्यातरी वर्तमानाच्या जंजाळापासून दूर राहायचे असल्याचे  शौरी यांनी म्हटले.