आशियासह मध्य पूर्व भागातील देश तसेच रशियाने गेल्या काही वर्षांत शस्त्रसंपन्नतेकडे अधिकाधिक लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे २०१४ मध्ये जगात संरक्षणावर होणाऱ्या खर्चात मोठय़ा प्रमाणात वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. गेल्या पाच वर्षांत प्रथमच लष्करी खर्चाचा आलेख उंचावल्याचे एका अभ्यासाअंती दिसून आले आहे.
आयएचएस जेनच्या वार्षिक संरक्षण अर्थसंकल्पीय आढाव्यात म्हटले आहे की, यावर्षी एकूणच लष्करी खर्चात ०.६ टक्क्य़ांनी वाढ झाली आहे. रशिया, चीन, भारत, सौदी अरेबिया आणि ओमान आदी देशांनी गेल्या दोन वर्षांत लष्करी खर्चात सातत्याने वाढ केल्याचे आयएचएस जेन अवकाश, संरक्षण आणि सुरक्षा विभागाचे संचालक पॉल बर्टन यांनी म्हटले आहे.
रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी लष्करी संपन्नतेकडे अधिक लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी पुढील तीन वर्षांत मोठय़ा प्रमाणात गुंतवणुकीचा निर्णय घेतला आहे. गेल्या वर्षी रशियाने तब्बल ६० अब्ज डॉलर लष्करी सामग्रीवर खर्च केले आहेत. हा खर्च जपान आणि ब्रिटनपेक्षा अधिक आहे. तर महासत्तेच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या चीनने तर गेल्या वर्षी १३९ अब्ज डॉलर खर्च केले आहेत. अमेरिकेच्या खालोखाल चीनचा हा खर्च आहे. २०१५मध्ये चीनकडून करण्यात येणारा खर्च हा ब्रिटन, फ्रान्स आणि जर्मनी या तिन्ही राष्ट्रांच्या एकत्रित खर्चापेक्षा अधिक असेल, असेही नमूद करण्यात आले आहे.
लष्करी संपन्नतेसाठी अधिकाधिक खर्च करण्याची प्रवृत्ती आशिया खंडातील देशांमध्ये २००९ पासून सुरू झाली आहे. पूर्व चिनी समुद्रातील वादग्रस्त बेटांच्या मुद्दय़ावरून चीन आणि जपानमधील संबंध ताणले गेले असून हेदेखील या शस्रसंपन्नतेमागचे कारण असल्याचे बोलले जात आहे.