नागरिकत्व दुरूस्ती विधेयक संसदेत मंजूर झाल्यानंतर आसाममध्ये आगडोंब उसळला आहे. गेल्या २४ तासांपासून हिंसाचार उफाळून आला असून, लष्कराला पाचारण करावे लागले आहे. संतप्त झालेल्या जमावानं छबुआ येथील भाजपा आमदाराचं घरच पेटवून दिले. जाळपोळीच्या घटना वाढल्यानंतर राज्य सरकारनं १४ पोलीस अधीक्षकांच्या बदल्या केल्या आहेत.

नागरिकत्व दुरूस्ती विधेयक लोकसभेपाठोपाठ राज्यसभेतही बुधवारी रात्री मंजूर करण्यात आले. या विधेयकाला आसाम, मेघालय, त्रिपुरा यासह ईशान्यकडील राज्यातून विरोध होत आहे. विधेयक मंजूर झाल्यानंतर आसाममध्ये हिंसाचार उफाळून आला. लोकांनी ठिकठिकाणी रस्त्यावर येत जाळपोळ केली. जमावाला रोखण्यासाठी सुरक्षा दलांनी गोळीबार केल्याच्या घटनाही काही ठिकाणी घडल्या. धक्कादायक बाब म्हणजे संतप्त जमावानं भाजपाच्या आमदारांचं घरही पेटून दिले. छबुआचे आमदार बिनोद हजारिका यांचं घर आंदोलकांनी पेटवून दिलं. त्याचबरोबर परिसरातील वाहने आणि कार्यालयही जमावानं पेटवून दिलं.

राज्यातील कायदा आणि सुव्यस्थेच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने शाळांना २२ डिसेंबरपर्यंत सुटी जाहीर केली आहे. तर हिंसाचाराच्या घटना वाढल्यानंतर ब्रह्मपुत्रा खोऱ्यातील ४ पोलीस उपआयुक्त आणि १४ पोलीस अधीक्षकांच्या तडकाफडकी बदल्या करण्यात आल्या आहेत. सध्या आसामसह शेजारील राज्यात निम लष्करी दलाच्या तुकड्या तैनात करण्यात आलेल्या आहेत. मात्र, परिस्थितीत कोणतीही सुधारणा होत नसल्यानं लष्कराला पाचारण करण्याचा निर्णय मुख्यम सचिवांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे.

लक्षवेधी घटना –

आसाममध्ये पुढच्या ४८ तासांसाठी मोबाइल इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.

गुवाहाटीचे पोलीस आयुक्त दीपक कुमार यांना हटवण्यात आले आहे. मुन्ना प्रसाद गुप्ता यांनी त्यांच्याजागी पदभार स्वीकारला आहे.

धाकुआखाना, लखीमपूर जिल्ह्यात आंदोलकांनी भाजपा आणि आसाम गण परिषदेचे कार्यालय पेटवून दिले.

हिंसक आंदोलनाचा ईशान्येकडच्या राज्यामधील हवाई आणि रेल्वे सेवेला फटका बसला आहे.

– आंदोलनामुळे अनेक खासगी विमान कंपन्यांनी कोलकाताहून आसाम आणि अन्य ईशान्येकडच्या राज्यांमध्ये जाणारी विमाने रद्द केली आहेत.

त्रिपुरा आणि आसाममधील रेल्वे सेवा स्थगित करण्यात आली आहे.

गुवाहाटीमध्ये अनेक नागरिकांनी संचारबंदी झुगारत रस्त्यावर उतरुन हिंसक आंदोलन केले. पोलिसांना आंदोलकांना पांगवण्यासाठी गोळीबार करावा लागला. गोळीबारात चार जण जखमी झाल्याचा दावा आंदोलकांनी केला आहे.