आसाममध्ये पुराने रौद्ररुप धारण केले आहे. पुरामुळे काझीरंगा अभयारण्यातील २२५ प्राण्यांचा मृत्यू झाला आहे. ‘काझीरंगा’मधील ३० टक्के परिसर पुराच्या पाण्याखाली आहे, अशी माहिती अभयारण्यातील अधिकाऱ्यांनी शनिवारी दिली.

या महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या पुरात काझीरंगाचा ७० टक्के परिसर पाण्याखाली गेला होता. त्यात १०५ प्राण्यांचा मृत्यू झाला होता, अशी माहिती अभयारण्याचे संचालक सत्येंद्र सिंह यांनी ‘आयएएनएस’ला दिली. पुराचे पाणी ओसरू लागले आहे. येथील परिस्थिती पूर्ववत होण्यासाठी आणखी काही दिवस लागतील, असेही त्यांनी सांगितले. मृत प्राण्यांमध्ये १७८ हरिण, १५ गेंडे, चार हत्ती आणि एका वाघाचा समावेश आहे.

दरम्यान, या महिन्याच्या सुरुवातीला आलेल्या पुरातून येथील जनजीवन पूर्वपदावर येत नाही तोच पुन्हा पुराने तडाखा दिला. राज्यातील २५ जिल्ह्यांतील ३३ लाख नागरिकांना या पुराचा तडाखा बसला आहे. मुसळधार पावसामुळे येथील घरे, सरकारी इमारतींचे नुकसान झाले आहे. तर रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. अनेक ठिकाणी पूल वाहून गेले आहेत. रेल्वे सेवा ठप्प झाल्याने ईशान्येकडील राज्यांचा देशातील इतर भागाशी संपर्क तुटला आहे. २०१२ मध्येही काझीरंगाला पुराचा तडाखा बसला होता. त्यात ७९३ प्राण्यांचा मृत्यू झाला होता. गेल्या वर्षीही पुरामुळे ५०३ प्राण्यांचा मृत्यू झाला होता.